पती भाजपमध्ये, मग मी कशाला राष्ट्रवादी वाढवू? आयात उमेदवार अर्चना पाटील यांचे विधान

विशेष म्हणजे अर्चनाताई पाटील आणि अजित पवार यांचे नाते आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या अर्चनाताई पाटील यांचे सासरे डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत. त्यामुळे पक्षापेक्षा त्यांचे नातेसंबंध जवळचे आहेत आणि पूर्वीश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच नेते आहेत आणि याच पक्षातून त्यांनी धाराशिव जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद सांभाळलेले आहे.
पती भाजपमध्ये, मग मी कशाला राष्ट्रवादी वाढवू? आयात उमेदवार अर्चना पाटील यांचे विधान

विशेष प्रतिनिधी/मुंबई

यंदाची लोकसभेची निवडणूकच न्यारी ठरत आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत लढत होणार आहे. दोन्हीकडे प्रमुख तीन पक्षांची आघाडी असल्याने या पक्षांचे नेते समन्वयाने विचारपूर्वक उमेदवारी देत आहेत. एखाद्या ठिकाणी एखाद्या पक्षाचा सक्षम उमेदवार नसेल, तर मित्रपक्षाचा उमेदवार आयात करून त्याला उमेदवारी दिली जात आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघात महायुतीत राष्ट्रवादीला ही जागा सुटली. या ठिकाणी भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांना राष्ट्रवादीत घेऊन त्यांना उमेदवारी देण्यात आली. प्रचारादरम्यान त्यांनी थेट ‘माझा नवरा भाजपमध्ये आहे. मी कशाला राष्ट्रवादी वाढवू,’ असे वक्तव्य करून थेट अजित पवार यांनाच धक्का दिला.

विशेष म्हणजे अर्चनाताई पाटील आणि अजित पवार यांचे नाते आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या अर्चनाताई पाटील यांचे सासरे डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत. त्यामुळे पक्षापेक्षा त्यांचे नातेसंबंध जवळचे आहेत आणि पूर्वीश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच नेते आहेत आणि याच पक्षातून त्यांनी धाराशिव जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद सांभाळलेले आहे. परंतु त्यांचे पती राणा जगजितसिंह पाटील सध्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार आहेत. धाराशिव लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सक्षम उमेदवार नव्हता. त्यामुळे विधान परिषदेचे आमदार विक्रम काळे, सतीश चव्हाण, सुरेश बिराजदार यांच्या नावाची चर्चा झाली. परंतु अखेर भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेऊन उमेदवारी देण्यात आली. यामुळे आधीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटला होता.

त्यातच आता अर्चनाताई पाटील यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. या निमित्ताने त्या विविध ठिकाणी गाठीभेटी घेत आहेत. आज बार्शी दौऱ्यावर असताना पत्रकारांनी त्यांना तुम्ही राष्ट्रवादीचे वर्चस्व वाढविणार का, असा सवाल उपस्थित केला, तेव्हा त्यांनी “माझा नवरा भाजपमध्ये आहे. मग मी कशाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवू,” असे म्हटले. बार्शीत आमदार राजेंद्र राऊत यांचे वर्चस्व आहे. राजेंद्र राऊत हे भाजपमध्ये आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. खासदारकीची उमेदवारी दिलेली असताना पक्षाबद्दल एवढी निष्ठा असेल, तर पक्षाची ताकद कशी वाढणार, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत नाराजी

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एखाद्या निष्ठावानाला उमेदवारी मिळावी, अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांची अपेक्षा होती. पण अर्चनाताई पाटील यांना भाजपमधून राष्ट्रवादीत घेऊन उमेदवारी दिली. त्यातच अर्चनाताई यांनी पक्षनिष्ठेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत नाराजी पसरली आहे. पक्षाने लोकसभेची उमेदवारी दिलेली असताना, अर्चनाताई पाटील असे कसे बोलू शकतात, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in