इकडून आले, तिकडे गेले आणि एका रात्रीत प्रचारक बनले!

अनिल देशमुख हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत. सध्या ते ईडीच्या जामिनावर आहेत. शरद पवारांचे खंदे समर्थक असले तरी प्रचारात ते गप्प आहेत. 'काटोल' या विधानसभा मतदारसंघात त्यांचा प्रभाव असला तरी 'ईडी'च्या हल्ल्याने ते व त्यांचे कुटुंबीय पूर्ण घायाळ झाले असल्याने गप्प आहेत.
इकडून आले, तिकडे गेले आणि एका रात्रीत प्रचारक बनले!

- अरविंद भानुशाली

मतं आणि मतांतरे

निवडणुका आल्या की, पक्षांतर मोठ्या प्रमाणात होते, परंतु २०२४ मध्ये तर वैचारिक पातळीवरचे पक्षांतर झाले आहे. अशोक चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले, त्यांचे वडील शंकरराव हे कट्टर काँग्रेसभक्त. तेही राज्याचे तीन वेळा मुख्यमंत्री, बाबरी पडत असताना केंद्रीय गृहमंत्री राहिलेले. त्यांच्या पत्नी व अशोक चव्हाण यांच्या मातोश्री कुसुमताई याही स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय झालेल्या. अशा अशोकरावांनी काँग्रेस पक्ष सोडून विरुद्ध विचारसरणी असलेल्या भाजपमध्ये प्रवेश केला. आता ते नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपचा प्रचार करणार आहेत. मात्र हे करीत असताना त्यांनी ६ वर्षांसाठी आपली राज्यसभेची नियुक्ती करून घेतली आहे.

दुसरे नेते मिलिंद देवरा हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व. मुरली देवरा यांचे चिरंजीव. देवरा कुटुंब म्हणजे इंदिरा गांधी, पुढे सोनिया गांधी, राहुल गांधी व राजीव गांधी यांचे विश्वासू सहकारी म्हणून गणले गेले होते. पक्षाचे खजिनदार हे पदही त्यांच्या हातात विश्वासाने काँग्रेस पक्षाने दिले होते. काही काळ मिलिंद देवरा हे केंद्रीय मंत्री देखील होते. तेही एका रात्रीत काँग्रेस सोडून तिकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले आणि त्यांनी आपली सहा वर्षांची बेगमी राज्यसभेची जागा घेऊन पूर्ण केली. आता ते मुंबईत शिवसेनेच्या प्रचारासाठी उतरले आहेत.

ज्यांनी आयुष्यभर काँग्रेस पक्ष जोपासला, विधानसभेचे सभापती लोकसभेचे सभापती, मंत्री राहिलेले शिवराज पाटील यांच्यात आता मतपरिवर्तन झाले आहे. खान्देशमधील माजी खासदार उन्मेष पाटील यांना भाजपने तिकीट नाकारताच तेही उडी मारून शिवसेना उद्धव ठाकरे गटात गेले आहेत. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक करून नेले तेव्हा गमजा करीत, हातवारे करीत आपण परत येऊ असे म्हणत होते. मुळात नवाब मलिक हे शरद पवारांचे खंदे समर्थक. त्यांना अटक केल्यानंतर शरद पवारांनी मलिक यांची बाजू घेत त्यांचा राजीनामा ते जेलमध्ये असले तरी घेऊ नये, अशी भूमिका घेतली होती. त्याप्रमाणे महाविकास आघाडीचे सरकार कोसळेपर्यंत नवाब मलिक मंत्री होते. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच असे घडले त्याचीच पुनरावृत्ती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या रूपाने पाहण्यास मिळत आहे. एखादा सरकारी कर्मचारी ७२ तास जेलमध्ये राहिला तर त्याची नोकरी जाते. परंतु येथे तर काहीच फरक पडत नाही.

अनिल देशमुख हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत. सध्या ते ईडीच्या जामिनावर आहेत. शरद पवारांचे खंदे समर्थक असले तरी प्रचारात ते गप्प आहेत. 'काटोल' या विधानसभा मतदारसंघात त्यांचा प्रभाव असला तरी 'ईडी'च्या हल्ल्याने ते व त्यांचे कुटुंबीय पूर्ण घायाळ झाले असल्याने गप्प आहेत. विशेषतः नागपूरमध्ये भाजपचे नितीन गडकरी हे उमेदवार असल्याने शरद पवारांपासून सर्वच नेते मूग गिळून आहेत. विदर्भात भाजपला काँग्रेस हा पर्याय होता. परंतु नेत्यांमधील हेराफेरीने कमी झाला आहे. भाजप एक-एक जागेसाठी आपली संपूर्ण ताकद लावत आहे. हे गडकरी चिमूर-गडचिरोली-चंद्रपूर जागेच्या उमेदवारी अर्जाच्या वेळी दिसून आले. ते मोदी-शहा यांचा जाहीर सभांच्या तारखा जाहीर झाल्या असून विरोधकांचे अजूनही जागावाटप सुरू आहे.

राज ठाकरेंसारखा दमदार नेता आपल्यापुढे असताना केवळ स्थानिक पातळीवरील मनसे नेत्यांत बिनसले म्हणून वसंत मोरेंनी मनसे सोडली. त्यानंतर कायÆ, त्यांनी उद्धवजी, शरद पवारांची, नाना पटोलेंच्या भेटी घेतल्या. परंतु राजसाहेबांच्या विरोधात मोरेंना कुणीही पाठिंबा दिला नाही. आता ते अक्षरशः पराभूत मनोवृत्तीने वंचितच्या पाठिंब्यावर उभे आहेत. मोरेंच्या उमेदवारीचा फायदा तर भाजपच्या उमेदवाराला होण्याची शक्यता आहे. पाहू या पुढे काय काय होते ते.

logo
marathi.freepressjournal.in