माढ्यामुळे महायुतीत राडा; मोहिते-पाटलांनंतर रामराजेही शरद पवार गटात जाण्याची शक्यता : भाजप उमेदवार संकटात

विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर सध्या अजित पवार गटासोबत आहेत. राष्ट्रवादीत फूट पडली, तेव्हा ते अजित पवार यांच्यासोबत गेले. परंतु...
माढ्यामुळे महायुतीत राडा; मोहिते-पाटलांनंतर रामराजेही शरद पवार गटात जाण्याची शक्यता : भाजप उमेदवार संकटात

विशेष प्रतिनिधी/मुंबई

विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर सध्या अजित पवार गटासोबत आहेत. राष्ट्रवादीत फूट पडली, तेव्हा ते अजित पवार यांच्यासोबत गेले. परंतु, माढ्याचे भाजपचे उमेदवार तथा विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि रामराजे निंबाळकर कुटुंबांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद आहे. त्यांच्या उमेदवारीला विरोध करूनही भाजपने त्याची दखल न घेता त्यांनाच उमेदवारी दिल्याने विजयसिंह मोहिते-पाटील कुटुंब आणि रामराजे निंबाळकर परिवाराचा त्यांना विरोध आहे. यावरून माढा लोकसभा मतदारसंघात उलथापालथ झाली असून मोहिते-पाटील कुटुंबीयांनी भाजपची साथ सोडली. त्यानंतर आता रामराजे निंबाळकरही त्याच भूमिकेत असल्याचे समजते.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे माढा लोकसभा मतदारसंघात वर्चस्व आहे. त्यामुळे त्यांना विश्वासात घेऊनच उमेदवारी जाहीर व्हायला हवी होती. परंतु, भाजपने त्यांचे मत डावलून पुन्हा रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपमधील मोहिते-पाटील गट नाराज झाला. तत्पूर्वी, विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली होती. परंतु, त्याचीही दखल घेतली गेली नाही. मोहिते-पाटील यांच्यासोबतच अजित पवार गटातील रामराजे नाईक-निंबाळकर यांचाही रणजितसिंह नाईक-निंबाळकरांच्या उमेदवारीला जोरदार विरोध होता. त्यामुळे आता ही नाराजीच महायुतीला महागात पडण्याची शक्यता आहे.

धैर्यशील मोहिते-पाटील यांनी गुरुवारी शरद पवार यांची भेट घेतली आणि राष्ट्रवादीकडून त्यांची उमेदवारी निश्चित झाली. त्यातच धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामाही देऊन टाकला. त्यामुळे भाजपला फार मोठा धक्का बसला आहे.

यासोबतच फलटणचे रामराजे नाईक-निंबाळकरही नाराज आहेत. ते सध्या अजित पवार गटात आहेत. तेदेखील आता शरद पवार यांच्या पक्षाची वाट धरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता अजित पवार गटाने सावध पवित्रा घेतला असून, त्यांना तत्काळ बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. थेट अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांच्याशी चर्चा करून समजूत घातल्याचे सांगितले जाते. परंतु, काहीही झाले तरी रामराजे निंबाळकर हे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना मदत करणारच नाहीत. त्यामुळे याचा फटका महायुतीला बसू शकतो.

रणजितसिंह मोहिते भाजपमध्येच राहणार?

आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत. पण मोहिते-पाटील कुटुंबीयांनी शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने आता ते भाजपसोबत राहणार की शरद पवार गटात जाणार, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यांना बाहेर पडायचे असेल तर विधान परिषदेचा राजीनामा द्यावा लागेल. आता ते काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

रणजितसिंह निंबाळकरांची फडणवीसांकडे तक्रार

मोहिते-पाटील आणि रामराजे यांच्या भूमिकेमुळे माढा लोकसभा मतदारसंघात महायुती कोंडीत सापडली आहे. त्यामुळे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आता महायुतीत राहून विरोध करणाऱ्या रामराजे निंबाळकर यांच्या विरोधात थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. शुक्रवारी रणजितसिंह निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांनी फडणवीस यांची भेट घेतली आणि याबाबत चर्चा केली.

...तर भाजप बारामतीत सुनेत्रा पवारांना मदत करणार नाही!

माढ्यात अजित पवार गटाचे रामराजे निंबाळकर आमच्याविरोधात काम करणार असतील, तर बारामतीत आम्हीसुद्धा सुनेत्रा पवारांना मदत करणार नाही, असा इशारा दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांनी दिला आहे. राहुल कुल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला निर्वाणीचा इशारा देताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून युतीधर्म पाळला जात नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, एकीकडे महाविकास आघाडीचे माढ्याचे गणित सुकर होत असताना महायुतीत धुसफूस वाढली आहे.

logo
marathi.freepressjournal.in