उमेदवारच स्वत:च्या मतदानाला मुकले; उमेदवारी एका मतदारसंघात, मतदान दुसऱ्या मतदारसंघात

लोकसभा निवडणुकीची चौथ्या टप्प्यातील निवडणूक सोमवारी पार पडली. या टप्प्यातही राज्यात ११ लोकसभा मतदारसंघात मतदान झाले.
उमेदवारच स्वत:च्या मतदानाला मुकले; उमेदवारी एका मतदारसंघात, मतदान दुसऱ्या मतदारसंघात
Published on

विशेष प्रतिनिधी/मुंबई

लोकसभा निवडणुकीची चौथ्या टप्प्यातील निवडणूक सोमवारी पार पडली. या टप्प्यातही राज्यात ११ लोकसभा मतदारसंघात मतदान झाले. यामध्ये तीन मराठवाड्यातील मतदारसंघ होते. या टप्प्यातही अपेक्षेप्रमाणे मतदानाची टक्क्वारी वाढली नाही. विशेष म्हणजे या टप्प्यात बरेच उमेदवार स्वत:साठी मतदानालाच मुकले. त्यामुळे त्यांच्यासाठी हा एक धक्का आहे. उमेदवार एक-एक मतासाठी प्रयत्न करीत असतो. बरेच उमेदवार स्वत:साठी आपलेच मत घेऊ शकले नाहीत. त्यामध्ये सुजय विखे, मंत्री संदीपान भुमरे, वसंत मोरे आदी उमेदवारांचा समावेश आहे.

चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी सकाळी ७ पासून सुरू झाले. दिवसभर मतदान प्रक्रिया सुरूच होती. दुपारच्या वेळी ऊन असल्याने गर्दी कमी झाली होती. मात्र, दुपारनंतर सर्व मतदान केंद्रांवर गर्दी वाढली. त्यामुळे सायंकाळी मतदानाची टक्केवारी बºयापैकी वाढल्याचे चित्र होते. अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, म्हणून शासन स्तरावर प्रयत्न केले गेले. परंतु मतदानाचा टक्का म्हणावा तसा वाढताना दिसत नाही. या टप्प्यात अनेक दिग्गज मैदानात आहेत. त्यामध्ये नगरमधून सुजय विखे आणि निलेश लंके, शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे आणि सदाशिव लोखंडे, जालन्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे यांच्यात लढत होत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे आणि संदीपान भुमरे यांच्यात लढत होत आहे. बीडमध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यात लढत होत आहे. शिरुरमध्ये डॉ. अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव, पुण्यात मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर, नंदूरबारमध्ये हिना गावीत आणि गोवाल पडवी, जळगावमध्ये करण पवार आणि स्मिता वाघ यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे चौथ्या टप्प्यातील लढती लक्षवेधी ठरल्या आहेत.

चौथ्या टप्प्यातही काही मतदान यंत्राचे किरकोळ बिघाड वगळता मतदान शांततेत पार पडले. परंतु बऱ्याच उमेदवारांना आपलेच मतदान स्वत:ला करता आले नाही. अर्थात, या टप्प्यात बरेच उमेवार स्वत:चे मत स्वत:ला देऊ शकले नाहीत. त्यामध्ये दिग्गज उमेदवारांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरमधील शिंदे गटाचे उमेदवार राज्याचे मंत्री संदीपान भुमरे यांचा मतदारसंघ पैठण हा जालना लोकसभा मतदारसंघात आहे. त्यामुळे त्यांना जालना मतदारसंघासाठी मतदान करावे लागले. यासोबतच नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुजय विखे यांचेही मतदान उत्तर म्हणजेच शिर्डी लोकसभा मतदारसंघात आहे. त्यामुळे तेही स्वत:ला मतदान करू शकले नाहीत. यासोबतच पुण्यातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांचे नाव पुण्यातील कात्रजमध्ये आहे. त्यांचा मतदारसंघ शिरुरला जोडलेला आहे. त्यामुळे त्यांनाही स्वत:साठी मतदान करता आलेले नाही.

सुजय विखे दुसऱ्यांदा मैदानात

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून डॉ. सुजय विखे हे दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढवित आहेत. परंतु त्यांचे मतदान आपल्या गावी लोणी येथेच आहे. लोणी हे गाव शिर्डी लोकसभा मतदारसंघात येते. खरे तर डॉ. सुजय विखे यांना मागच्या पाच वर्षांत दक्षिण नगरमधून आपले मतदान नोंदवून घेता आले असते. परंतु त्यांनी तसे केलेले नाही. त्यामुळे त्यांना आपल्यासाठी मतदानदेखील करता आले नाही.

logo
marathi.freepressjournal.in