पुणे : राज्याच्या राजकारणात घडलेल्या घडामोडींमुळे लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी विचित्र परिस्थिती पाहायला मिळत आहे. पाच वर्षांपूर्वी एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे आता एकत्र आले आहेत. तर सोबत असणारे विरोधक झाले आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात ज्या श्रीरंग बारणे यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा पराभव केला होता, त्याच श्रीरंग बारणेंचा प्रचार करण्याची नामुष्की अजित पवार यांच्यावर ओढवली आहे.
पवार कुटुंब हे नेहमीच पुणे जिल्ह्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू राहिले आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार विरुद्ध अजित पवार असेच राजकारण सुरू आहे. तसेच बारामतीमध्ये सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार अशी नणंद-भावजय यांच्यात लढत होणार आहे. पाच वर्षांपूर्वी २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबीय एकत्र होते. त्यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी निवडणूक लढवली होती. परंतु शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला होता. आता अजित पवार त्याच श्रीरंग बारणे यांचा प्रचार करणार आहेत. पवार कुटुंबीयांचा पहिला पराभव पार्थच्या रूपाने मावळ लोकसभेत झाला होता. श्रीरंग बारणे यांनी २०१९ साली अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना अस्मान दाखवले होते. त्यावेळी श्रीरंग बारणे यांनी ७ लाख २० हजार ६६३ मते मिळाली होती. पार्थ पवार यांना ५ लाख ४ हजार ७५० मते मिळाली होती. बारणे यांनी ५२.६५ टक्के मते घेऊन दणदणीत विजय मिळवला होता. पार्थ पवार यांना ३६.८७ टक्के मते मिळाली होती. त्यापूर्वी २०१४ मध्ये श्रीरंग बारणे यांचा विजय झाला होता. त्यांनी लक्ष्मण पांडुरंग जगताप यांचा पराभव केला होता. आता सरळ तिसऱ्यांदा विजय मिळवण्याच्या तयारीत श्रीरंग बारणे आहेत. पार्थ पवारांचा पराभव अजित पवार यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. इतकेच नव्हे तर या पराभवासाठी कारणीभूत असणाऱ्या नेत्यांना सुद्धा पाडण्याची भूमिका अजित पवार यांनी घेतली होती. मात्र, आता गेल्या पाच वर्षांमध्ये खूप काही घडामोडी राज्याच्या राजकारणात घडल्या आहेत. शिवसेनची जशी दोन शकले झाली, तशीच राष्ट्रवादी कॉँग्रेसचीही दोन शकले झाली. अजित पवार गट महायुतीबरोबर आहे. मावळ लोकसभा मतदार संघात श्रीरंग बारणे हे महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर राजकारणातील समीकरणे बदलून गेली आहेत. त्यामुळे ज्यांनी पराभव केला, त्यांच्या विजयासाठीच उतरण्याची वेळ आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे २०१९ मध्ये ज्या विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी पार्थचा पराभव केला होता, त्यांच्यासाठीच आता अजितदादांना प्रचारासाठी मैदानात उतरावे लागले आहे. सोमवारी मावळ लोकसभेमध्ये महायुतीची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती.