पुण्यात निवडणुकीसाठी कडेकोट बंदोबस्त; १०,५०० पेक्षा अधिक पोलीस तैनात

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पुढील काळात प्रचार सभांचा धडाका सुरू होणार आहे. या विभागातील काही मतदारसंघ संवेदनाक्षम आहेत. तसेच, निवडणूक प्रचारासाठी विविध राजकीय पक्षांचे नेतेमंडळी शहरातील विविध भागात रॅली, प्रचारासाठी येणार आहेत.
पुण्यात निवडणुकीसाठी कडेकोट बंदोबस्त;  १०,५०० पेक्षा अधिक पोलीस तैनात

पुणे : लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताची आखणी केली आहे. तब्बल १० हजार ५०० हून अधिक पोलीस, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामध्ये ९३० अधिकाऱ्यांचा समावेश आहे. १० मतदान केंद्रे संवेदनशील असून त्याठिकाणी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पुढील काळात प्रचार सभांचा धडाका सुरू होणार आहे. या विभागातील काही मतदारसंघ संवेदनाक्षम आहेत. तसेच, निवडणूक प्रचारासाठी विविध राजकीय पक्षांचे नेतेमंडळी शहरातील विविध भागात रॅली, प्रचारासाठी येणार आहेत. त्या लक्षात घेऊनच जाहीर सभा, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी जादा पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.

बंदोबस्तासाठी साडेदहा हजार पोलिसांसह ९३० अधिकाऱ्यांचा फौजफाटा तैनात केला जाणार आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारित पुणे लोकसभा मतदारसंघासह, शिरूर, बारामती लोकसभा मतदारसंघाचा काही भाग समाविष्ट आहे. बारामती मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार आहे. संबंधित मतदारसंघात खडकवासला, पुरंदर विधानसभा मतदारसंघाचा काही भाग आहे.

बारामती, हडपसर व शिरूरमध्येही सुमारे ५ हजार कर्मचारी तैनात

बारामती मतदारसंघातील काही भाग पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी तेथे ३७० पोलीस अधिकारी, साडेतीन हजार पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे ४७५ जवान, निमलष्करी दल आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या प्रत्येकी दोन तुकड्या असा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात १३ मे रोजी पुणे लोकसभा आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदान होणार आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघातील काही शिरूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. १३ मे रोजी तेथे ५६० पोलीस अधिकारी, सात हजार पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे १ हजार ९०० जवान, निमलष्करी दलाच्या तीन तुकड्यांसह राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्या तैनात ठेवण्यात येणार आहेत.

कायदा-सुव्यवस्थेसाठी विशेष खबरदारी

कायदा-सुव्यवस्था व जातीय सलोखा राखण्यासाठी पुणे पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. स्थानिक पोलिसांकडून रूटमार्च, पेट्रोलिंगवर भर दिला आहे. दरम्यान, निवडणुकीत मतदान होईपर्यंत पोलिसांना दक्षता घ्यावी लागणार आहे. तत्पूर्वी कोम्बिंग ऑपरेशन, सराईतांची हजेरी, तडीपार आरोपींची धुंडाळणी करण्यासाठी प्लॅनिंग करण्यावर पोलिसांनी भर दिला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in