मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागा मिळण्याची शक्यता आहे, असा अंदाज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. शरद पवार यांनी आज (९ मे) साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालायत थोर समाजसुधारक आणि रयत संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६५ व्या पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्ताने पत्रकारांशी संवाद साधला.
राज्यात आतापर्यंत तीन टप्प्यात मतदान झाले असून तुमच्या नजरेतून महाराष्ट्राचे चित्र कसे दिसते? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, "मला असे दिसते की, पाच वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षाला १ जागा मिळाली होती, आम्हाला ४ जागा मिळाल्या होत्या आणि १ एमआयएमला जागा मिळाली होती. एकंदरीत ६ जागा विरोधीपक्षांना मिळाल्या होत्या. आता असे दिसते की, आम्हा लोकांची (महाविकास आघाडी) संख्या ३० ते ३५ यांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. लोकांना बदल पाहिजे, काँग्रेस, राष्ट्रवादी यांची विचारधारा त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या संघटनेला लोकांचे समर्थन मिळत असल्याचा ट्रेंड मला दिसत आहे", असे शरद पवार म्हणाले.
पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यानंतर मोदी अस्वस्थ
शरद पवार म्हणाले, "पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर मोदी अस्वस्थ झाले आहे, असे दिसते. कारण, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर मोदींनी आपला कल बदलला आहे. यानंतर मोदींनी मुस्लिम समाजाचा थेट उल्लेख करण्यास सुरुवात केली. आता धर्मांध विचार घेऊनच काही बदल होऊ अशा प्रकारची चर्चा त्यांच्या मनात असावी, हेच दिसून येत. जसे जसे टप्पे जातील, तसे तसे त्यांचे स्थान हे संकटात जात आहे, अशा प्रकारची भावना त्यांच्या पक्षातील सहकार्यात असावी, असे निरीक्षण माझे आहे."