मुंबई कुणाची? राज्यातील १३ मतदारसंघांत मतदान; महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार चुरस

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी राज्यातील उर्वरित १३ मतदारसंघांत मतदान होणार आहे.
मुंबई कुणाची? राज्यातील १३ मतदारसंघांत मतदान; महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार चुरस

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी राज्यातील उर्वरित १३ मतदारसंघांत मतदान होणार आहे. मुंबई-ठाणे-नाशिक या सुवर्ण त्रिकोणातील या सर्व जागा असून, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपले सर्वस्व पणाला लावले आहे. मुंबईतील सहा जागा महायुती आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. सोमवारी मतदारराजा 'मुंबई का किंग कौन' हे ठरविणार आहे. मुंबईकर सर्वच्या सर्व जागा एकाच्या पारड्यात टाकणार की संमिश्र कौल देणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. पाचव्या टप्प्यात केंद्रीय मंत्री पियूष गोयल, कपिल पाटील, भारती पवार यांच्यासह वर्षा गायकवाड, मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे आदींचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

पाचव्या टप्प्यात १३ मतदारसंघांत एकूण २६४ उमेदवार रिंगणात आहेत. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांची निवडणूक पाच टप्प्यांत विभागली गेली होती. सोमवारी पाचव्या व शेवटच्या टप्प्यात उर्वरित १३ मतदारसंघांत मतदान होईल व महाराष्ट्रातील मतदान समाप्त होईल. पुढील दोन टप्प्यांत अन्य राज्यांतील ११४ मतदारसंघांत निवडणूक होईल व ४ जूनला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे पुढचे दोन आठवडे निकालाच्या प्रतीक्षेत जाणार आहेत.

२०१९ ला या सर्व जागांवर भाजप-शिवसेना युतीचे वर्चस्व

या टप्प्यात मुंबईतील सहा, ठाण्यातील तीन, नाशिकमधील दोन मतदारसंघांसह पालघर व धुळे मतदारसंघात मतदान होणार आहे. २०१९ ला या सर्व जागा शिवसेना-भाजप युतीने जिंकल्या होत्या. पण राज्यातील राजकीय उलथापालथीमुळे यावेळी सर्वच मतदारसंघात अत्यंत चुरशीची निवडणूक होत आहे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक यंदा चुरशीची ठरली. भाजपच्या चारसौ पारच्या नाऱ्याला इंडिया आघाडीने प्रतिआव्हान दिले. महाराष्ट्रात महाविकास आघाडी २०१९ पासूनच अस्तित्वात होती. पण शिवसेना आणि राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीमुळे राज्याच्या राजकारणाचा चेहरामोहराच बदलून गेला. मात्र, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसने उर्वरित शक्ती एकवटून भाजप, शिंदे सेना व अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या महायुतीला जोरदार आव्हान दिले आहे. एकवटलेले विरोधक, तोडफोडीच्या राजकारणामुळे लोकांमध्ये असलेली नाराजी, मराठा आरक्षणामुळे बदललेले सामाजिक समीकरण, संविधान बदलाच्या चर्चेमुळे निर्माण झालेली अस्वस्थता आदी मुद्द्यांमुळे सुरुवातीला एकतर्फी वाटणारी महाराष्ट्राची निवडणूक अतिशय चुरशीची बनली आहे. २०१९ ला भाजप-शिवसेना युतीला ४८ पैकी ४१ जागा मिळाल्या होत्या. यावेळी मोठी पिछेहाट होऊ नये यासाठी भाजपने आपली सगळी ताकद महाराष्ट्रात पणाला लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात तब्बल २५ सभा घेतल्या. मुंबईत रोड शोही केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सव्वाशेच्या आसपास सभा घेतल्या. याशिवाय अमित शहा, अनेक केंद्रीय मंत्री, योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री राज्यात प्रचाराला आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ७८ सभा घेतल्या, तर २६ रोड शो केले. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांच्याबरोबरच अनेक केंद्रीय नेते प्रचारात उतरले होते. राहुल गांधी, प्रियांका गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रचारासाठी आले होते.

प्रशासनाची तयारी पूर्ण

चुरशीची निवडणूक, प्रचारादरम्यान झालेल्या चकमकी लक्षात घेऊन सोमवारच्या मतदानासाठी मुंबईत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबई शहरात ५ अपर पोलीस आयुक्त, २५ पोलीस उपायुक्त, ७७ सहाय्यक पोलीस आयुक्तांसह २५ हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात असतील. याशिवाय ३ दंगल नियंत्रण पथके, गृहरक्षक दलाचे जवानही तैनात करण्यात आले आहेत. केंद्रीय सुरक्षा दलाच्या ३६ तुकड्याही अतिरिक्त कुमक म्हणून सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

मतदानाच्या टक्केवारीला वाढत्या उकाड्याचे आव्हान

महाराष्ट्रात एक बीड मतदारसंघ वगळता मतदानाची सरासरी टक्केवारी मागच्या इतकीच राहिली आहे. बीडमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान झाले आहे. इतर ठिकाणी मात्र फारसा उत्साह दिसून आलेला नाही. त्यातच मुंबई परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून वाढता पारा ही डोकेदुखी ठरली आहे. तसेच अनेक मुंबईकर हे उन्हाळी सुट्टीनिमित्ताने गावी अथवा बाहेर अन्यत्र फिरायला गेले आहेत. त्यामुळे तापमानाचा वाढता पारा आणि सुट्टीवर असणारे मुंबईकर याचा मतदानाच्या टक्केवारीला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, संध्याकाळी ऊन ओसरल्यावर चार ते सहाच्या दरम्यान मुंबईकर मोठ्या प्रमाणात मतदानास उतरतील, अशी अपेक्षा आहे.

प्रमुख लढती

 • धुळे : सुभाष भामरे (भाजप) - शोभा बच्छाव (काँग्रेस)

 • दिंडोरी : डॉ. भारती पवार (भाजप) - भास्कर भगरे (राष्ट्रवादी, शरद पवार)

 • नाशिक : हेमंत गोडसे (शिवसेना, शिंदे) - राजाभाऊ वाझे (शिवसेना, ठाकरे)

 • पालघर : भारती कामडी (शिवसेना, ठाकरे) - हेमंत विष्णू सावरा (भाजप) - राजेश पाटील (बहुजन विकास आघाडी) -

 • भिवंडी : कपिल पाटील (भाजप) -बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे (राष्ट्रवादी, शरद पवार) - निलेश सांबरे (अपक्ष)

 • कल्याण : श्रीकांत शिंदे (शिवसेना, शिंदे) - वैशाली दरेकर राणे (शिवसेना, ठाकरे)

 • ठाणे : राजन विचारे (शिवसेना, ठाकरे) - नरेश म्हस्के (शिवसेना, शिंदे)

 • मुंबई उत्तर : पियूष गोयल (भाजप) - भूषण पाटील (काँग्रेस)

 • मुंबई उत्तर-पश्चिम : अमोल कीर्तीकर (शिवसेना, ठाकरे) - रवींद्र वायकर (शिवसेना, शिंदे)

 • मुंबई उत्तर-पूर्व : मिहिर कोटेचा (भाजप) - संजय पाटील (शिवसेना, ठाकरे)

 • मुंबई उत्तर मध्य : वर्षा गायकवाड (काँग्रेस) - उज्ज्वल निकम (भाजप)

 • मुंबई दक्षिण मध्य : राहुल शेवाळे (शिवसेना, शिंदे) - अनिल देसाई (शिवसेना, ठाकरे)

 • मुंबई दक्षिण : अरविंद सावंत (शिवसेना, ठाकरे) - यामिनी जाधव (शिवसेना, शिंदे)

मुख्यमंत्री शिंदे, उद्धव ठाकरे यांच्या अस्तित्वाची लढाई

शेवटच्या टप्प्यात १३ मतदारसंघांपैकी सात ठिकाणी भाजप, तर सहा मतदारसंघांत मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेची महाविकास आघाडीशी लढत आहे. भाजपचा आग्रह असतानाही मुख्यमंत्र्यांनी दक्षिण मुंबई, ठाणे व नाशिकची जागा सोडली नाही. त्यामुळे या जागा निवडून आणण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. शिवाय ठाणे या आपल्या बालेकिल्ल्यात तसेच कल्याणमध्ये मुलासाठी विजय मिळवणे त्यांना आवश्यक आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्यासाठीही हा टप्पा महत्त्वाचा असणार आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुंबईत चार, ठाण्यातील दोन, याशिवाय नाशिक व पालघर अशा आठ जागा लढवत आहे. यातील सहा ठिकाणी मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेशी त्यांचा थेट सामना होणार आहे. खरी शिवसेना कोणाची याचा निर्णय जनता करेल, असे उद्धव ठाकरे नेहमी सांगत असतात. त्यामुळे जनतेचा कौल कुणाला, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राहुल, राजनाथ, अब्दुल्ला यांचे भवितव्य ठरणार भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद होणार

देशभरात पाचव्या टप्प्यात सोमवारी ८ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील एकूण ४९ जागांवर मतदान होणार आहे. या टप्प्यात एकूण ६९५ उमेदवारांचे भवितव्य ठरणार असून यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राहुल गांधी, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, चिराग पासवान आदी दिग्गजांचा समावेश आहे.

मतदानापूर्वी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना तडीपारीच्या नोटिसा

प्रचारतोफा थांबल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना लोकसभा मतदानापूर्वी सलग तीन दिवसांसाठी तडीपार केल्याच्या नोटिसा प्राप्त झाल्या. यावर पदाधिकाऱ्यांनी त्रागा केल्यानंतर पोलीस आयुक्तालयाने स्पष्टीकरण देत गुन्हे असलेल्या पदाधिकाऱ्यांवर हद्दपारीची कारवाई केल्याचा खुलासा केला. याअन्वये शहरातील ३१३ संशयितांविरुद्ध २० मे रोजी मतदानप्रक्रिया संपेपर्यंत या स्वरूपाची कारवाई केल्याचे आयुक्तालयाने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in