पुणे : बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळणार असल्याने सर्वांचेच या लढतीकडे लक्ष लागले आहे. शरद पवार हे सुप्रिया सुळेंसाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत. बारामतीचा गड राखण्यासाठी पवारांनी जुळवाजुळव सुरू केली आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून शरद पवारांनी आपले प्रतिस्पर्धी आणि जुन्या कट्टर विरोधकांच्या भेटीगाठी घेण्याचा सिलसिला सुरू केला आहे. शरद पवारांनी त्यांच्या उमेदीच्या काळापासूनचे कट्टर प्रतिस्पर्धी काकडे कुटुंबीयांची शुक्रवारी भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. साधारण ५५ वर्षांनी शरद पवार यांनी काकडे कुटुंबीयांची भेट घेतली.
मुंबई फेडरेशनचे उपाध्यक्ष शामराव काकडे यांच्या निवासस्थानी जाऊन शरद पवारांनी त्यांची भेट घेतली. माजी खासदार कै. संभाजी काकडे यांची पत्नी कंठावती काकडे यांचे नुकतेच निधन झाल्यानंतर पवार हे त्यांचे सांत्वन करण्यासाठी गेले होते. पवार-काकडे हा संघर्ष सर्वांनाच ज्ञात आहे. त्यामुळे या भेटीला राजकीय रंग आला आहे. पवारांनी याअगोदर मार्च महिन्यात कट्टर विरोधक अनंतराव थोपटेंची भेट घेतली होती. या दोन्ही भेटीने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. अनंतराव थोपटे हे मागील अनेक वर्षांपासून शरद पवारांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जात होते.
बारामतीच्या सभोवताली अनेक नेत्यांशी त्यांनी संघर्ष केला. हे सगळ्यांना माहिती आहे. अनेकांनी हा संघर्ष जवळून पाहिला आहे. याच प्रकारचा संघर्ष बारामतीत काकडे कुटुंबीयांशी होता. हा संघर्ष साधारण ५५ वर्षे गाजला, मात्र आता काकडे कुटुंबातील नव्या पिढीशी साखर कारखान्याच्या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू झाला. मात्र, आता या भेटीमुळे हा संवाद आणखी दोन पावले पुढे गेल्याचे दिसत आहे. या भेटीच्या माध्यमातून अनेक वर्षांचा संघर्ष दूर करण्याचा किंवा तणाव कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि बेरजेचे राजकारण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होताना दिसत आहे. याचा फायदा लोकसभा निवडणुकीत होऊ शकतो.
चंद्रराव तावरे यांचीही घेतली भेट
बारामती तालुक्यातील सांगवी या ठिकाणी गेले असताना शरद पवारांनी एकेकाळचे वर्गमित्र आणि गेली २५ वर्षं विरोधात काम करीत असलेले पवार यांचे दुसरे विरोधक भाजपचे ज्येष्ठ नेते व माळेगाव कारखान्याचे माजी चेअरमन चंद्रराव तावरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार यांच्याविरोधात अनेक वर्षं त्यांचा संघर्ष सुरू होता. यात कधी तावरेंकडे तर कधी पवार गटाकडे कारखान्याची सूत्रे होती. आता अजित पवार यांच्या वर्चस्वाखाली माळेगाव कारखाना आहे. शरद पवार यांनी शुक्रवारी ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांची देखील भेट घेतली. भेटीवेळी सर्व सहकारी पदाधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात आले होते आणि बंद दाराआड साधारण १० मिनिटे चर्चा झाली. या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावेळी चंद्रराव तावरे यांनी शरद पवार हे आमच्या घरी आले नाहीत तर शेजारी राहणाऱ्या काकडे कुटुंबीयांकडे सांत्वनपर भेटीला आले होते. त्यानंतर आमची भेट झाली. या भेटीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले.