दुसऱ्या टप्प्यातही यादीत घोळ; अनेकजण मतदानाविना परतले, प्रशासनाची अनास्था कायम

अनेक ठिकाणी मतदार यादीत घोळ आढळून आल्याने मतदार यादीत जाणीवपूर्वक घोळ केल्याचा आरोप मतदारांमधून होत आहे. आमची नावे जाणीवपूर्वक वगळली गेली आहेत, असाही आरोप करण्यात येत आहे.
(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)

विशेष प्रतिनिधी/मुंबई

राज्यात पहिल्या टप्प्यात मताची टक्केवारी फारशी वाढली नाही. त्याचे कारण मतदारांची अनास्था हे तर होतेच. यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे मतदार यादीचा घोळ झाल्याने अनेकांना मतदान न करताच घरी परतावे लागले होते. यामागील प्रशासनाची हलगर्जी महागात पडत आहे. कारण दुसऱ्या टप्प्यातदेखील त्याचीच प्रचिती आली. कारण अनेक मतदान केंद्रावरून अनेकांना मतदान न करताच घरी परतावे लागले. त्यामुळे मतदान कमी होण्याला प्रशासनदेखील तितकेच जबाबदार असल्याची चर्चा अनेक ठिकाणी रंगली.

एकीकडे लोकशाही जिवंत ठेवायची असेल, तर भरभरून मतदान झाले पाहिजे, असा आग्रह धरला जात आहे. तसेच मतदानाअगोदर मतदार जागृतीही वेगात सुरू आहे. घरोघरी जाऊन मतदानाचा हक्क बजावावा, असेही सांगितले जात आहे. एवढी जनजागृती होत असताना मतदानाचा टक्का वाढला पाहिजे. परंतु प्रत्यक्षात म्हणावा तसा आकडा वाढताना दिसत नाही. त्यामुळे एक तर मतदारांमध्ये उदासीनता पसरल्याचे चित्र आहे. सोबतच प्रशासनानेदेखील म्हणावी तशी काळजी घेतलेली दिसत नाही. कारण मतदारयादी अपडेट करीत असताना मतदारांची नावे वगळली जाणार नाहीत, याची काळजी घेणेदेखील प्रशासनाचे काम आहे. परंतु त्याची काळजी न घेतल्याने अनेकांना मतदान केेंद्रावर येऊन मतदानाविना परतावे लागले आहे. या मतदार यादीतील घोळामुळे अनेक ठिकाणी गोंधळाचे वातावरण झाल्याचे पाहायला मिळाले.

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ५ जागांवर मतदान झाले. आता दुसऱ्या टप्प्यात ८ जागांवर मतदान पार पडले. त्यामध्ये नांदेड, हिंगोली, परभणी, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ-वाशिम आणि बुलडाणा या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघांत शांततेने मतदान पार पडले. सकाळच्या टप्प्यात मतदारांनी गर्दी केली होती. दुपारच्या वेळी गर्दी कमी झाली. त्यानंतर सायंकाळी उत्स्फूर्त मतदान झाले. परंतु बऱ्याच ठिकाणी मतदार यादीतील घोळामुळे गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. अकोल्या तर याचे प्रमाण अधिक होते. अनेक ठिकाणी मतदारांमधून तीव्र संतापही व्यक्त करण्यात आला.

नावे गहाळ केल्याचा आरोप

अनेक ठिकाणी मतदार यादीत घोळ आढळून आल्याने मतदार यादीत जाणीवपूर्वक घोळ केल्याचा आरोप मतदारांमधून होत आहे. आमची नावे जाणीवपूर्वक वगळली गेली आहेत, असाही आरोप करण्यात येत आहे. मात्र, याचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होत आहे. पहिल्या टप्प्यातही याचीच प्रचिती आली. याचा ठपका प्रशासनावर ठेवला जात आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी ईव्हीएमची मशीनही बंद पडली. त्यामुळे गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, यवतमाळमध्ये बोगस मतदानावरून गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in