कल मतदारसंघाचा : ईशान्य मुंबईत अटीतटीची लढत; मिहिर कोटेचा, संजय दिना पाटील यांचा कस लागणार

मुंबई उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य मुंबई मतदारसंघातून भाजपाने यंदाही त्यांची विदयमान खासदार बदलत नवीन चेहऱ्याला संधी देण्याची परंपरा कायम राखत मनोज कोटक यांच्या ऐवजी मिहिर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे. तर...
कल मतदारसंघाचा : ईशान्य मुंबईत अटीतटीची लढत; मिहिर कोटेचा, संजय दिना पाटील यांचा कस लागणार

- मंदार पारकर

मुंबई उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य मुंबई मतदारसंघातून भाजपाने यंदाही त्यांची विदयमान खासदार बदलत नवीन चेहऱ्याला संधी देण्याची परंपरा कायम राखत मनोज कोटक यांच्या ऐवजी मिहिर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे. तर कोटक यांना महाविकास आघाडीकडून शिवसेना उदधव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी आव्हान दिले आहे. या मतदारसंघाची रचना, विविध भाषिक मतदार तसेच सद्या मतदारसंघाचे जातीय-भाषिक गणित पाहून पेटविण्यात आलेले राजकीय मुददे पाहता ही लढत मुंबईतील सर्वाधिक चुरशीच्या लढतींपैकी एक असेल असेच चित्र आहे.

२०१९ मध्ये विजयाचे अंतर तीन लाख मतांचे होते. यंदा अतिशय अटीतटीची लढत होणार असून विजयाचे अंतर तीस ते पन्नास हजारांच्या आतच असेल असा अनेकांचा होरा आहे. सध्या या मतदारसंघात गुजराती-मराठी वाद चांगलाच पेटविण्यात आला आहे. याचा निश्चित परिणाम मतदानावर होण्याची शक्यता आहे.

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात  शिवाजीनगर म्हणजे मानखुर्द शिवाजीनगर, त्यानंतर  घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड, भांडुप हे भाग येतात.या मतदारसंघात ६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून मानखुर्द शिवाजीनगर, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, भांडूप पश्चिम, विक्रोळी, मुलुंड हे मतदारसंघ येतात. मुलुंडमध्ये स्वत: मिहिर कोटेचा हे आमदार आहेत. विक्रोळीत सुनील राउत शिवसेना,भांडूप पश्चिम रमेश कोरगावकर शिवसेना,घाटकोपर पश्चिम राम कदम भाजपा,घाटकोपर पूर्व पराग शहा भाजपा असे भाजपा शिवसेनेचेच वर्चस्व आहे. अपवाद फक्त मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघाचा असून येथे समाजवादी पार्टीचे अबू असिम आझमी हे आमदार आहेत.

१९७७ आणि १९८० अशा सलग दोन निवडणुका जिंकणारे सुब्रमण्यम स्वामी हे या मतदारसंघातील एकमेव खासदार आहेत. गुरूदास कामत आणि किरिट सोमैया यांनी या मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधीत्व केले पण सलग निवडून यायची संधी यांना मिळाली नाही. भाजपाचे दिवंगत ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांनाही येथून मतदारांनी एकदा लोकसभेत पाठविले होते. २००९ साली हा मतदारसंघ तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या संजय दिना पाटील यांच्याकडे आला. २०१४ साली भाजपाचे किरिट सोमैया येथून विजयी झाले. २०१९ मध्ये किरिट सोमैया यांनाच पुन्हा एकदा तिकिट मिळेल अशी स्थिती होती. मात्र महापालिकेतील गैरव्यवहार बाहेर काढत असताना किरिट सोमैया यांनी वांद्रयाचा माफिया असा केलेला शब्दप्रयोग शिवसेनेला प्रचंड झोंबला होता. तेव्हा शिवसेनेच्या दबावामुळे सोमैया यांचे तिकिट कापून मनोज कोटक यांना संधी देण्यात आली. कोटक यांनी संजय दिना पाटील यांचा पराभव केला होता.

यंदा भाजपाने कोटक यांच्या ऐवजी कोटेचा यांना संधी दिली आहे. या मतदारसंघात डंपिंग ग्राउंडचा प्रश्न मोठा आहे. हे डंपिंग ग्राउंड बंद करण्याचे आश्वासन सर्वच उमेदवारांनी दिले आहे. घाटकोपर रमाबाई आंबेडकर नगर,मानखुर्द शिवाजीनगर,भांडूप आणि विक्रोळी पार्कसाईट येथील झोपडपटटयांचा प्रश्न. तिथे कोसळणा-या दरडी हे महत्वाचे प्रश्न आहेत. तसेच धारावीच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. तेथील पाच हजार प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन मुलुंडमध्ये करण्यात येणार असल्याने मुलुंडकरांमध्ये अस्वस्थता आहे. ठाणे-नवी मुंबईतून ट्रॅफिक याच भागात येत असल्याने येथे वाहतुकीची समस्याही मोठया प्रमाणात आहे. मराठी भाषिक मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी सुरू आहे.

भाषिक अस्मिता महत्त्वाची

या मतदारसंघात एकूण १६ लाख ३६ हजार ८९० मतदार आहेत. त्यातील सुमारे साडेसात लाख मराठी भाषिक असून अडीच लाख मुस्लिम,जवळपास दोन लाख गुजराती-मारवाडी तर पावणेदोन लाखाच्या आसपास उत्तर भारतीय मतदार आहेत. आता या मतदारसंघात गुजराती-मराठी वाद सुरू झाला आहे. मराठी भाषिकांना नोकरी नाकारणारी जाहिरात आणि याच मतदारसंघातील एका गुजराती भाषिक सोसायटीत कथितरित्या शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना प्रचार करण्यास नाकारणे असे दोन मुददे चांगलेच ऐरणीवर आले आहेत. भाषिक अस्मितेचा मुद्दा या मतदारसंघात महत्वाचा ठरू शकतो.

logo
marathi.freepressjournal.in