ठाकरे गटाचा पाठिंबा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! ‘एनडीए’ला बहुमत मिळणार; देवेंद्र फडणवीस यांना विश्वास

‘मेघदूत’ या शासकीय निवासस्थानी फडणवीस यांनी निवडक पत्रकारांशी बातचीत केली. रिंगणात केवळ एकच उमेदवार असून...
ठाकरे गटाचा पाठिंबा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! ‘एनडीए’ला बहुमत मिळणार; देवेंद्र फडणवीस यांना विश्वास

- एस. बालकृष्णन

लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच सर्वांचे लक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लागलेले आहे. महाविकास आघाडीशी दोन हात करताना फडणवीस हे महायुतीची धुरा सांभाळत आहेत. ‘मेघदूत’ या शासकीय निवासस्थानी फडणवीस यांनी निवडक पत्रकारांशी बातचीत केली. रिंगणात केवळ एकच उमेदवार असून त्यांचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी असे आहे आणि विकसित भारत हे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जनता मोठ्या प्रमाणावर त्यांच्या पाठीशी आहे, असे फडणवीस म्हणाले.

प्रश्न : पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात सातत्याने प्रचारासाठी का येत आहेत, निवडणुकीत कामगिरी चांगली होणार नाही, असा महायुतीला विश्वास वाटत नाही का ?

उत्तर : तसा कोणताही प्रकार नाही, २०१९ पेक्षा आम्ही अधिक चांगली कामगिरी करू, मोदींच्या सभांना राज्यभर उदंड प्रतिसाद मिळत आहे, यावेळी भरपूर वेळ मिळाल्याने आम्ही जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत. विरोधी पक्षांच्या काही उमेदवारांचा १०० टक्के पराभव व्हावा, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

प्रश्न : अयोध्येत भव्य राम मंदिर उभारले त्याचा राजकीय लाभ मिळणार नाही, असे वाटते का ?

उत्तर : राम मंदिर हा भाजपचा कधीही राजकीय मुद्दा नव्हता. देशाच्या संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्याचा एक भाग म्हणून या प्रश्नाकडे आम्ही पाहतो, आम्ही निवडणुकीत याचा मुद्दा म्हणून वापर केला नाही. मात्र मोदी हे शब्दाचे पक्के आहेत, हा संदेश जनतेपर्यंत पोहोचला. राम मंदिर उभारण्याचे आश्वासन त्यांनी दिले आणि ते पूर्ण केले.

प्रश्न : उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाला बिगर राजकीय मदत करण्याची तयारी मोदी यांनी अलीकडेच दर्शविली हा निवडणुकीनंतर शिवसेनेशी (उबाठा) संबंध प्रस्थापित करण्याचा संकेत आहे का?

उत्तर : हा त्याचा संदर्भ नाही, उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली, तेव्हा मोदी उद्धव यांच्या सातत्याने संपर्कात होते. मोदी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यात व्यक्तिगत संबंध होते आणि भावनिक नाते आजही आहे. बाळासाहेबांच्या विचारधारेपासून उद्धव दूर गेले हे दुर्दैव आहे. शिवसेनेचा (उबाठा) पाठिंबा घेण्याचा प्रश्नच नाही. कारण एनडीएला चांगले बहुमत मिळणार आहे. उद्धव मोदींवर वैयक्तिक हल्ले चढवत आहेत त्याची आम्ही दखल घेतली आहे. परंतु राजकारणात कोणीही भविष्य वर्तवू शकत नाही.

प्रश्न : भाजप आणि अविभक्त शिवसेना अनेक वर्षे एकत्र होती, त्यांच्यात समझोता शक्य आहे का ?

उत्तर : आम्ही आघाडी तोडली नाही, उद्धव यांच्या अहंकारामुळे आघाडी तुटली, जेव्हा एकनाथ शिंदे यांना बहुसंख्य शिवसेना आमदारांचा पाठिंबा आहे असे लक्षात आले, तेव्हा उद्धव यांना त्यांच्या पुत्राला मुख्यमंत्री करावयाचे होते, नारायण राणे यांच्याबाबतचा अनुभव चांगला नव्हता, त्यामुळे उद्धव यांना ठाकरे कुटुंबातील मुख्यमंत्री हवा होता आणि आदित्य ठाकरे हे त्यांचे उमेदवार होते.

प्रश्न : शिवसेनेत फूट पडण्यास तुम्ही कारणीभूत असल्याचे बोलले जाते ?

उत्तर : आपण शिवसेनेत फूट पाडली नाही, मुख्यमंत्रीपद पटकावण्याची उद्धव यांची महत्त्वाकांक्षा होती, त्यामुळे फूट पडली. शिंदे यांची शिवसेनेत गळचेपी होत होती आणि त्यामुळेच त्यांनी बाहेर पडण्याचे ठरविले. भाजप आणि शिंदे यांची शिवसेना बाळासाहेबांच्या विचारसरणीमुळे एकत्र आले. उद्धव यांनी मराठी माणसासाठी काय केले?

प्रश्न : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आशीर्वादाने यापूर्वी अजित पवार यांनी तुमच्याशी हातमिळवणी केली होती, असे स्वत: अजित पवार यांनीच सांगितले, शरद पवार भाजपच्या विरोधात कधीही नव्हते ?

उत्तर : शरद पवार यांनी अजित पवार यांना प्रोत्साहन दिले आणि नंतर माघार घेतली. अजित पवार यांना खलनायक ठरविण्याची ती खेळी होती, शरद पवार यांना केवळ त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांना बढती देण्यात स्वारस्य होते.

logo
marathi.freepressjournal.in