Lok Sabha Election : अमरावतीत सभेवरून राजकारण तापले; बच्चू कडू आणि राणांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप

केंद्रीय मंत्री अमित शहा यांची आज अमरावतीमधील सायन्स कोअर मैदानावर सभा होणार आहे.
Lok Sabha Election : अमरावतीत सभेवरून  राजकारण तापले; बच्चू कडू आणि राणांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप

मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचार तोफा आज (२४ बुधवारी ) थंडावणार आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शहा यांची आज अमरावतीमधील सायन्स कोअर मैदानावर सभा होणार आहे. या मैदानावरील आमची सभा रद्द करून अमित शहांना अचानक सभेची परवानगी देण्यात आल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. त्यावरून भाजपच्या उमेदवार नवनीत राणा व त्यांचे आमदार पती रवी राणा आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांच्यात वाद सुरू आहे.

या मैदानावर प्रहारचे उमेदवार दिशेन बूब यांची सभा होणार होती. यासाठी मैदानाची बुकिंगही केली होती आणि पैसे देखील दिले होते. तरीही, विनापरावानगी सायन्स कोअर मैदानावर अमित शहांची सभा कशी होते? असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे. बच्चू कडू आणि अमरावती पोलिसांमध्ये मंगळवारी संध्याकाळी वाद देखील झाला होता. तेव्हा बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. यामुळे अमरावतीमध्ये बच्चू कडू आणि नवनीत राणा हे आमने-सामने आले आहे.

ज्या ताटात खाल्ले त्या ताटाला भोक पाडणे ही त्यांची सवय - रवी राणा

बच्चू कडू यांच्या आक्रमक भूमिकेवर आमदार रवी राणा यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांच्यावर टीका केली आहे. या मैदानावर सभा घेऊन माझा प्रचार थांबवायचा होता, या कडू यांच्या आरोपावर बोलताना, "निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे निवडणुकीचा प्रचार थांबणार आहे. महाराष्ट्राने बच्चू कडू यांची सोंगे आणि नौटंकी अनेकदा पाहिली आहे. आंदोलन करून मीडियात चर्चेत राहणे ही त्यांची सवय आहे. ज्या ताटात खाल्ले त्या ताटाला भोक पाडणे ही त्यांची सवय आहे. आज देशाच्या गृहमंत्र्यांची सभा होणार आहे. यासाठी जिल्हा आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी सुरक्षेची पाहणी केल्यानंतर सायन्स कोअर मैदानावर सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे", असे रवी राणा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

बच्चू कडूंनी मारहाणीचे सर्व धंदे सोडावे - रवी राणा

बच्चू कडू यांनी रवी राणा यांना न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे, यावर रवी राणा म्हणाले, यापूर्वी बच्चू कडू यांनी माझ्यावर शंभर कोटींचा दावा करणार असल्याचे सांगितले होते. यानंतर मला खलबत्त्यात कुटल्यासारखा कुटणार होते. बच्चू कडू यांनी माझा आणि नवनीत राणा यांचा बाप काढला. आमच्याविरोधात त्यांनी अनेकदा अपशब्दाचा वापर केला होता. मला वाटते की, मी कायदेशीर लढाई लढायला तयार आहे. मी कायदेशीर काम करतो. मी लोकशाहीच्या निर्णयाप्रमाणे चालतो. त्यामुळे मला वाटते की, बच्चू कडू यांनी देखील लोकशाहीप्रमाणे वागले पाहिजे. बच्चू कडू यांनी दादागिरी करून पोलिसांना मारहाण करणे आणि त्यांच्यावर हात उचलणे, कार्यकर्त्यांना मारहाण करणे हा धंदा योग्य नाही, असे मला वाटते", असे म्हणत रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर हल्लाबोल केला.

राणाला पराभव दिसत असल्यामुळे नवीन 'गेम' केलाय- बच्चू कडू

प्रहारच्या उमेदवारांची ग्रामीण भागात लोकप्रियता वाढली या प्रश्नावर बच्चू कडू म्हणाले, "आमच्या आतापर्यंत १०० सभा झाल्या आहेत. प्रत्येक गाव खेड्यात सभा घेऊन लोकांसमोर आमचे विचार मांडले. शेतकरी आणि कष्टकरी या सर्व लोकांची बाजू मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि रोजगार सेवक, हे सर्व जण मेहनत करतात पण, त्यांचा पगार वाढत नाही. गावखेड्यात काम करणारा खालचा घटक आहे. मग शेतकरी, शेतमजूर, कामगार, काही छोटे छोटे व्यापार हे कसे डुबणार आहे, हे आम्ही आमच्या सभेतून सांगितले. देशात अदानी आणि अंबानी कसा मोठा खेळ खेळणार आहे. बाजार समितीचे व्यापारी देखील येत्या काळात धोक्यात येणार आहे, अशी अवस्था निर्माण होणार आहे. या सर्व व्यवस्थेविरोधात आम्ही वैचारीक मांडणी केली आहे. आम्ही प्रचारात जाती-धर्माचे गणित सांगितले नाही. शेतकरी, मजूर म्हणून एकत्र होता येईल का? याकडे आम्ही लक्ष दिले. याला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. आमच्या सर्व सभांना रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली आहे. आमच्या सभेसाठी लोकांना पैसे देण्याची गरज पडली नाही. लोक स्वत:हून सभेला हजेरी लावत होते. राणाला पराभव दिसत असल्यामुळे त्यांनी हा नवीन 'गेम' केला आहे.

...तर निवडणुका कशासाठी ठेवल्या - बच्चू कडू

बच्चू कडू पुढे म्हणाले, "मैदानासाठी आम्हाला २३ तारखेला सात वाजता सांगता की, तुम्हाला आता परवानगी नाही. उद्याच आमचा ऐवढा मोठा कार्यक्रम तुम्ही व्यवस्थित दाबण्याचा प्रयत्न केला. पण कायदाच यांच्या हाती आहे, असे जर होत गेले तर, निवडणुका कशासाठी ठेवल्या. तुम्ही स्वत: जाऊन मशीनचे बटण दाबाना. त्या पोलीस आयुक्तालाच बटण दाबायला सांगाना. कलेक्टरला काही वाटते की नाही, निवडणुका असल्यामुळे मी थांबलो आहे नाही तर आमचा मूळ स्वभाव थांबायचा नाही आणि थांबणार पण नाही. त्या सर्वांना आम्ही आडवे घेऊ, असे कडू म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in