यंदाची निवडणूक खूपच आगळीवेगळी; नाशिकमध्ये मशाल, धुळ्यात काँग्रेसची बाजी तर दिंडोरी २० वर्षांनी राष्ट्रवादीकडे

नाशिक, दिंडोरी, आणि धुळे या तिन्ही लोकसभा मतदारसंघात अनपेक्षित उमेदवार असूनही एकतर्फी वाटणाऱ्या लढती चुरशीच्या झाल्या.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

हारून शेख/लासलगाव

नाशिक, दिंडोरी, आणि धुळे या तिन्ही लोकसभा मतदारसंघात अनपेक्षित उमेदवार असूनही एकतर्फी वाटणाऱ्या लढती चुरशीच्या झाल्या. महायुतीने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (दिंडोरी) विद्यमान खासदार हेमंत गोडसे (नाशिक) आणि माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे (धुळे )या विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी देऊन विश्वास व्यक्त केला.

डॉ. पवार केंद्रीय राज्यमंत्री आणि सासरे स्वर्गीय ए. टी. पवार यांची पुण्याई असल्याने दुसऱ्यांदा तिकीट मिळवण्यात यशस्वी ठरल्या. त्यांच्यासमोर महाविकास आघाडी कोणास तिकीट देते, याविषयी उत्कंठा असताना भास्कर भगरे या जिल्हा परिषद स्तरावरील माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सभापती सामान्य शिक्षक, कार्यकर्त्यास दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी पवार गट उमेदवारी देण्यात आली तर २०१९ मध्ये सिन्नर मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर नाशिक लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाने उमेदवारी दिली. एकीकडे काँग्रेस पक्षाची निरीक्षक म्हणून धुळे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांच्याकडे होती उमेदवाराचा शोध घेत असताना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तुषार शेवाळे यांना डावलत बच्छाव यांच्या गळ्यात पक्षीय उमेदवारीची माळ पडली. सुरवातीला विरोधानंतर धुळे मालेगावात चुरस निर्माण केली.

नाशिक मतदारसंघ

नाशिक मतदारसंघात महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजेविरुद्ध महायुतीचे खासदार हेमंत गोडसे यांच्यात वाटणारी दुरंगी लढत अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांमुळे तिरंगी लढत झाली शिवसेनेत बंड झाल्यानंतर मशाल चिन्हाची पहिलीच मोठी निवडणूक नाशिकमध्ये मशालने इतिहास घडवीत विद्यमान खासदार गोडसे धनुष्यबाणाची हॅटट्रिक रोखून दीड लाखाहून अधिक मतांनी राजाभाऊ वाजे यांनी विजय मिळविला.

यंदाची ही निवडणूक खूपच आगळीवेगळी ठरली. विशेषता शिवसेनाविरुद्ध शिवसेना असा सामना मतदारांना पहायला मिळाला. दोन्ही बाजूकडून प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत दोन्ही गट आमने-सामने आल्याची परिस्थिती उद्भवली होती. ठाकरे गटाने सुरुवातीपासूनच सहानुभूतीचे कार्ड वापरले. ठाकरे गटांनी सोशल मीडिया पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मदतीने मशाल चिन्ह घरी घरी पोहोचवली. राजाभाऊ वाजे यांचे मित्र भाष्य व्यक्तिमत्व सर्वसामान्य सर्वसाधारण उमेदवाराची प्रतिमा महाविकास आघाडीने मतदारसंघापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. स्थानिक मुद्द्यांना हात घालत महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांची हॅटट्रिक रोखली. प्रामुख्याने नाशिक शहराची भाजपच्या तीन आमदारांवर जबाबदारी होती.

धुळ्यात काँग्रेसची बाजी

धुळे लोकसभा मतदारसंघात माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे आणि महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य राज्यमंत्री शोभा बच्छाव यांच्या दुरंगी लढतीत शेवटच्या फेरी आखेरपर्यंत अटीतटीची लढत होऊन अखेर काँग्रेसने बाजी मारली. उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरू होण्याच्या काही तास अगोदर काँग्रेसने शोभा बच्छाव यांना उमेदवारी घोषित केली. निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून मुस्लीम उमेदवार देण्याचा प्रयत्न झाला. परंतु उमेदवार अर्ज छाननीच्या वेळी अर्ज बाद झाला. एमआयएम पक्षाने मताचे ध्रुवीकरण टाळून काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निवडणुकीतील जातीय समीकरणेच बदलली. मुस्लिम आदिवासी दलित समाजाची पारंपरिक मते अधिक संख्येने पारड्यात येतील, असे मानून काँग्रेसने प्रचाराला वेग दिला. काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार इम्रान प्रतापगडी, अमोल कोल्हे आधी स्टार प्रचारकांच्या सभांबरोबरच मोदी सरकारची शेतकरीविरोधी धोरणे कांदा निर्यातबंदीचा प्रश्न देशासह राज्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न, महागाईमुळे त्रस्त झालेली जनता, महिलांवरील वाढते अत्याचार, पिण्याचे पाणी, सिंचन औद्योगीकरणाला चालना न देणे, संविधान बदलणे आदी मुद्द्यांवर प्रचारात भर देण्यात आला. तर मुस्लिमबहुल इलाक्यातील मतदान काढण्यात मोठा यश मिळवल्याने आणि मालेगावमध्ये मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट,एमआयएम आणि समाजवादी पक्षाची एकगठ्ठा मुस्लिम मते बहुसंख्येने पारड्यात पाडून घेतल्याने डॉ. शोभा बच्छाव यांचा विजय सुकर झाला, तर सुभाष भामरे यांनी मोदी आणि विकासकामांवर फोकस, यात नाशिक जिल्ह्याचे पालक मंत्री दादा भुसे यांचे प्रयत्न कमी पडल्याने भामरेचे हॅटट्रिक हुकले.

दिंडोरी मतदारसंघ २० वर्षांनी राष्ट्रवादीकडे

दिंडोरी मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. भारती पवारांना मतदारांची नाराजी, शेतकऱ्यांचा संताप, पक्षांतर्गत असंतोषाने लोकसभाची दुसरीवारी अडचणीची ठरली माकपचे माजी आमदार जीवा पांडू गावित यांनी माघार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांना पाठबळ दिल्याने महाविकास आघाडी सुसाट सुटली. एक सामान्य शिक्षक सामाजिक कार्यकर्ता म्हणून लोकसभा निवडणुकीतील उमेदवार या अर्थाने प्रचारात साधेपणा दाखविला. त्यामुळे मतदारसंघातील मतदारांची मन जिंकून घेतल्याचे प्रत्यंतर आले. सन २००९ ची नरहरी झिरवाळ यांची निवडणूक २०१४ ला डॉ. भारती पवार यांची (राष्ट्रवादी) निवडणूक अथवा २०१९ धनराज महाले यांची निवडणूक काळात प्रचाराची नियोजनाची जबाबदारी भगरे यांनी पार पाडली होती. एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून भगरे यांनी स्वतःच्या प्रचार काळात कार्यकर्त्यांसोबत जमिनीवर बैठक मारून भोजनाचा आस्वाद घेणाऱ्या प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून जाणारी व्यक्ती म्हणून जवळचे वाटणाऱ्या लोकांनी तळमळीने काम केल्याने ऐकीकडे पैशाचा वापर तर दुसरीकडे लोक वर्गणीची मदत आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव सेना, काँग्रेस यांनी मनापासून एकदिल्याने काम केले सर्वांनी साथ दिली. कांदा प्रश्न हा या निवडणुकीत कळीचा मुद्दा होता, भाजपने कांदा द्राक्ष सोयाबीन भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना भाव दिला नाही, ही भावना प्रचार काळात होती आणि निवडणुकीच्या मतदान केंद्रापर्यंत कांद्याच्या माळी गळ्यात घालून शेतकऱ्यांची नाराजी चित्र स्पष्टपणे दिसत होते. भाजपकडे पैसा होता मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी मतदारांनी पैसा गोळा करून मदत केली आणि शेती आणि स्थानिक प्रश्नांचा मुद्दा भगरे यांच्या पथ्यावर पडल्याने त्यांचा विजय सुकर झाला. दुसरे अपक्ष भगरे सर चर्चेचा विषय दिंडोरी मतदारसंघात भाजपला निवडणूक जड जाणार याची चाहूल पहिलीच लागली असावी म्हणून नाशिक तालुक्यातील गंगावाडी येथील पास असलेले सदू भगरे यांचा दिंडोरी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे तिसरी पास असताना त्यांना सर ही उपाधी देखील दिली गेली. महाविकास आघाडीचे विजय उमेदवार भास्कर भगरे शिक्षक असल्याने त्यांना सर म्हणून ओळखले जाते.

त्यामुळे त्यांचे मताचे विभाजन होण्यासाठी भगरे नावाची व्यक्ती शोधून त्याला सर ही उपाधी लावून चिन्ह देखील तुतारी देण्यात आल्याने निवडणुकी त त्यांनी एक लाख मत मिळवली, हा दिवसभर चर्चेचा विषय होता.

logo
marathi.freepressjournal.in