महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होणार? आज दिल्लीत महत्त्वाची बैठक

महायुतीतील नवा भिडू मनसेच्या सहभागाबद्दलही या बैठकीत चर्चा होऊ शकते.
महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होणार? आज दिल्लीत महत्त्वाची बैठक
संग्रहित छायाचित्र, पीटीआय
Published on

प्रतिनिधी/मुंबई

भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (उपमुख्यमंत्री अजित पवार) महायुतीची रखडलेली जागावाटपाची चर्चा गुरुवारी दिल्लीत होत असून या बैठकीत महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. महायुतीतील नवा भिडू मनसेच्या सहभागाबद्दलही या बैठकीत चर्चा होऊ शकते.

महायुतीच्या जागावाटपाच्या बैठकीला भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिंदे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तर राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित राहणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघात मतदान होत आहे. या मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत २७ मार्च अशी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने जागावाटपाचा निर्णय लवकर घ्यावा, यासाठी आग्रह धरला आहे. पक्षाला ९ ते १० जागा मिळाव्यात, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. यासंदर्भात सकारात्मक चर्चा होऊन येत्या एक ते दोन दिवसात जागावाटप जाहीर होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.

ज्यावेळी महायुतीचे जागावाटप होईल, त्यावेळी ते सन्मानजनक असेल. महाराष्ट्रात महायुतीच्या सर्वाधिक जागा कशा जिंकता येतील, याबाबत सर्वंकष विचार सुरू आहे. त्यामुळे या प्रक्रियेला वेळ लागत आहे, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले .

विजय शिवतारेंच्या वक्तव्याची मुख्यमंत्री दखल घेतील

विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेवरून बोलताना तटकरे म्हणाले, “अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कणा आहेत. ज्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती, त्यावेळी पुरंदरची जागा काँग्रेसकडे होती. त्या निवडणुकीत शिवतारेंनी शरद पवार यांच्याबाबत चुकीचे वक्तव्य केले होते. त्यामुळे अजित पवार चिडले होते आणि त्यांनी शिवतारेंना आव्हान दिले होते. तेव्हा अजित पवार हे आघाडी आणि पक्ष वाचविण्यासाठी बोलले होते. ते काहीही चुकीचे वागले नाहीत. त्यामुळे शिवतारे जे बोलत आहेत, त्याची दखल मुख्यमंत्री घेतील आणि योग्य तो मार्ग काढतील, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. तसेच शिवतारे जे बोलत आहेत त्याची स्क्रिप्ट कुणी लिहिली, याचा आम्ही शोध घेत आहोत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आमची काँग्रेससोबतची आघाडी तुटल्याने इंदापूरमध्ये दत्ता भरणे निवडून आले. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना विरोध करण्याचा प्रश्नच नव्हता. तेथेही आम्ही मार्ग काढू, असेही तटकरे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in