प्रतिनिधी/मुंबई : लोकसभेच्या निवडणुका घोषित होऊन राज्यातील पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने महाविकास आघाडी आणि महायुतीतीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. लोकसभेच्या जागावाटपाला अंतिम स्वरूप देण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे.
महायुतीत मनसेला सामावून घेण्याचा निर्णय झाल्याने बदललेल्या परिस्थितीत जागावाटपाचा फेरआढावा घेण्यासाठी महायुतीची येथील एका पंचतारांकित बैठक पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने जागावाटपाच्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची बुधवारी मध्यरात्री गुप्त बैठक पार पडली आहे. याबाबत अशा भेटी होतच असतात, असे फडणवीस यांनी स्पष्ट करत अधिक बोलायचे टाळले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक पार पडली. या तिघांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. भाजपने महाराष्ट्रातील २० उमेदवारांची घोषणा केल्यानंतरही महायुतीत जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अशातच मनसेच्या सहभागामुळे हा तिढा आणखी वाढला आहे. मनसेची दोन ते तीन जागांची मागणी आहे. त्यामुळे या जागांसाठी महायुतीतील कोणत्या पक्षाने त्याग करायचा यावर तिघांमध्ये चर्चा झाली. राज ठाकरे यांना शिंदे गट आणि भाजपच्या कोट्यातील जागा दिली जाऊ शकते. भाजपकडे दक्षिण मुंबई तर शिंदे गटाकडे शिर्डी किंवा नाशिकचा पर्याय आहे. या जागांबाबत राज ठाकरे यांची भूमिका बैठकीत जाणून घेण्यात आली.
दरम्यान, या भेटीबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा सुरू असून योग्यवेळी योग्य निर्णय होईल, असे सांगितले. तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांना अशा भेटी होतच असतात. असे सांगून या बैठकीबाबत अधिक भाष्य करण्याचे टाळले. महाविकास आघाडीच्या गेल्या अडीच महिन्यांपासून बैठका सुरू आहेत. मात्र, त्यांचा निर्णय झालेला नाही. आम्ही एकाच बैठकीत ८० टक्के जागांबाबत निर्णय केला आहे. दुसऱ्या बैठकीत २० टक्के जागांबाबत निर्णय करू, असेही फडणवीस यांनी बोलताना सांगितले.