शिंदे गटाची खेळी; महिन्याभरापूर्वी आलेल्या रवींद्र वायकरांना उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातून उमेदवारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी वायकर यांनी सोमवारी रात्री भेट घेतली होती.
शिंदे गटाची खेळी; महिन्याभरापूर्वी आलेल्या रवींद्र वायकरांना उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातून उमेदवारी

मुंबई : अखेर महायुतीतील उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला आहे. शिंदे गटाने लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधीच पक्षात आलेले उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या रवींद्र वायकर यांना उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. वायकर यांना उमेदवारी जाहीर केल्याची माहिती शिंदे गटाच्या वतीने एका सोशल मीडिया पोस्टद्वारे देण्यात आली. या मतदारसंघात ठाकरे गटाने आधीच अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता रवींद्र वायकर विरुद्ध अमोल किर्तिकर या दोघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे.

महाविकास आघाडीने अमोल कीर्तिकरांच्या नावाची घोषणा केल्यानंतरही महायुतीकडून कोण लढणार याबाबत मात्र कोणाचीही अधिकृत घोषणा झाली नव्हती. येथून संजय निरुपम यांना शिंदे गट तिकीट देईल अशी जोरदार चर्चा रंगली होती. शिंदे गट आणि भाजपमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याच्या बातम्याही येत होत्या. अखेर आज शिंदे गटाने रवींद्र वायकर उत्तर-पश्चिम मुंबईतून महायुतीचे उमेदवार असल्याचे जाहीर केले. माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी वायकर यांनी सोमवारी (२९ एप्रिल) रात्री भेट घेतली होती. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री आणि वायकर यांच्यात रात्री उशीरापर्यंत उमेदवारीबाबत चर्चा झाल्याचे समजते. या भेटीतच वायकरांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जात आहे.

अवघ्या महिन्याभरात वायकरांना मिळाली उमेदवारी

महिन्याभरापूर्वीच वायकर यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला होता. गेल्या काही महिन्यापासून जोगेश्वरीतील राखीव भूखंडावर हॉटेल उभारून आर्थिक लाभ घेतल्याप्रकरणी ईडीचा ससेमिरा वायकरांच्या मागे होता. या प्रकरणी ईडीने वायकरांना अनेकदा चौकशीसाठी बोलाविले होते. या चौकशीला कंटाळून वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर आज त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली.

logo
marathi.freepressjournal.in