मुंबई पालिकेतील घोटाळ्याची लोकायुक्तांकडून दखल ;आदित्य ठाकरे : दिल्लीच्या आदेशाने मुंबईची लूटमार

मातोश्री येथे आयोजित पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे बोलत होते. मुंबई पालिकेच्या घोटाळ्याची लोकायुक्तांनी दखल घेत सुनावणी लावल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुंबई पालिकेतील घोटाळ्याची लोकायुक्तांकडून दखल ;आदित्य ठाकरे : दिल्लीच्या आदेशाने मुंबईची लूटमार

मुंबई : मुंबई महापालिकेतील फर्निचर घोटाळ्यासंदर्भात आपण लोकायुक्तांना पत्र पाठवले होते. त्याची दखल लोकायुक्तांनी घेतली असून त्यावर सुनावणी ठेवली आहे. फेब्रुवारी महिन्यातील सुनावणीला महापालिका आयुक्तांनाही बोलावले असून तक्रारदार म्हणून मी देखील उपस्थित राहणार आहे, असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. पालिकेचे किती रस्ते तयार झाले आहेत ते दाखवा, असा सवाल उपस्थित करत दिल्लीच्या आदेशाने मुंबईची लूटमार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट केवळ कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने झाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मातोश्री येथे आयोजित पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे बोलत होते. मुंबई पालिकेच्या घोटाळ्याची लोकायुक्तांनी दखल घेत सुनावणी लावल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. या सुनावणीला मुंबई महापालिका आयुक्तांना उपस्थित राहण्याचे आदेश लोकायुक्तांनी दिले असल्याचे सांगून आदित्य ठाकरे म्हणाले, ‘‘लोकायुक्तांना स्ट्रीट फर्निचर घोटाळ्यासंबंधी आम्ही पुरावे दिले आहेत. मुंबईची लूट आम्ही होऊ देणार नाही. रस्ते घोटाळा आम्ही उघडकीला आणत आहोत. महापालिकेला मान्य करावे लागले की, ४०० कोटींचे व्हेरिएशन थांबावे लागले, हा सुद्धा विषय लोकायुक्तांसमोर आणणार आहोत. ज्या रस्त्याचे कंत्राट रद्द केले, ते कंत्राटदार कोर्टात गेले आहेत. नवीन रस्त्याची निविदा काढली, त्यात ३०० कोटी कमी केले आहेत. आधीच कंत्राटदार कोर्टात गेले आणि नवीन टेंडरवर स्टे आणला आहे. ११ जानेवारीपर्यंत टेंडरला स्थगिती आहे. आयुक्तांसोबत आम्ही यावर चर्चा करायला तयार आहोत.

दिशा सालियनप्रकरणी शर्मिला ठाकरे यांनी पुतण्याची म्हणजे आदित्य ठाकरे यांची बाजू घेत, आदित्य असे काही करेल असे वाटत नाही, असे म्हटले होते. त्यावर आदित्य ठाकरे यांना पत्रकारांनी विचारले असता, ‘‘मला वाटते आम्ही त्यावर बोललो आहोत. त्यावर अधिक बोलण्यापेक्षा मुंबईचे प्रश्न महत्त्वाचे आहेत.’’ एका कौटुंबिक समारंभात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले होते. त्याबाबत विचारले असता, ‘‘उद्धव ठाकरे फक्त शुभेच्छा देण्यासाठी गेले होते,’’ असे आदित्य ठाकरे म्हणाले.

दिल्लीच्या आदेशाने मुंबईची लूट

‘‘किती रस्ते झाले ते दाखवा. रस्ते पूर्ण होणार नाहीत, याला जबाबदार आपले मुख्यमंत्री आहेत. ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टरचा फरक मुख्यमंत्र्यांना कळत नाही. तुम्ही मुंबईची लूटमार दिल्लीच्या आदेशाने करताय, असेही आदित्य ठाकरे यांनी सुनावले. एमटीएचएलचे काम ८३ टक्के आमच्या सरकारमध्ये पूर्ण झाले. आता उद‌्घाटनाला एवढा वेळ लागतोय. हे काम अजून तयार नाही? दीड महिना स्वार्थासाठी पेंडिंग ठेवलाय. नवी मुंबई मेट्रोचे काम सुद्धा पाच महिने ठेवले आहे. दिघा स्टेशन ८ महिने झाले तयार आहे. पण, व्हीआयपींना उद‌्घाटनाला वेळ मिळत नाही. मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या जिल्ह्यात उद‌्घाटन करता येत नाहीये, तुम्ही राज्याचा कारभार काय करणार? एमटीएचएल, उरण लाईन, दिघा स्टेशन सुरू करा, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in