Loksabha Election 2024 : भाजपने उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना दिली उमेदवारी; पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया

भाजपच्या पहिल्या यादीत पूनम महाजन यांचे नाव नव्हते. तेव्हापासून पूनम महाजन यांना उमेदवारी मिळणार की नाही, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होत्या. या मतदारसंघासाठी अभिनेत्री माधुरी दीक्षितला सुद्धा भाजपने ऑफर दिल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
Loksabha Election 2024 : भाजपने उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना दिली उमेदवारी; पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : उत्तर-मध्य मुंबईतून भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट करत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. यानंतर उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्यात चुरशी लढत होणार आहे. या मतदारसंघातून पूनम महाजन या दोन टर्म खासदार राहिल्या आहेत.

भाजपच्या पहिल्या यादीत पूनम महाजन यांचे नाव नव्हते. तेव्हापासून पूनम महाजन यांना उमेदवारी मिळणार की नाही, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होत्या. या मतदारसंघासाठी अभिनेत्री माधुरी दीक्षितला सुद्धा भाजपने ऑफर दिल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचेही नाव देखील चर्चेत आले होते. अखेर भाजपने शनिवारी (२७ एप्रिल) उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिल्याचे जाहीर केले.

उमेदवारी मिळाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. देशाची सुरक्षा आणि सार्वभौमत्व कसे आबादी राहिली हे लक्ष्यात ठेवूनच मी भाजपमध्ये प्रवेश करावा असे वाटले, अशी पहिली प्रतिक्रिया उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.

गेल्या १० वर्षापासून उत्तर-मध्य मुंबईतून लोकसभा मतदारसंघात सेवा करण्याची संधी दिली आहे. त्याबद्दल मी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार, अशी पहिली प्रतिक्रिया पूनम महाजन यांनी तिकीट कापल्यानंतर एक्सवर (आधीचे ट्वीट) दिली आहे. पूनम महाजन म्हणाल्या, "गेल्या दहा वर्षांपासून एक खासदार म्हणून मुंबई उत्तर- मध्य लोकसभा मतदारसंघाची सेवा करण्याची संधी देण्यात आली. त्याबद्दल भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार. मला एक खासदार म्हणून नव्हे तर एक मुलगीप्रमाणे स्नेह दिल्याबद्दल मतदारसंघातील माझ्या कुटुंबासारखी असलेल्या जनतेची मी सदैव ऋणी राहीन. हे नातं कायम राहील अशी आशा आहे. माझे आदर्श, माझे वडील स्वर्गीय प्रमोद महाजन यांनी मला, ‘राष्ट्र पहिले, नंतर आपण’ ही शिकवण दिली आहे. आजीवन याच मार्गावर मी चालेन अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करते. माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण सदैव देशसेवेसाठी समर्पित राहील, असे त्यांनी म्हटले.

उज्ज्वल निकम यांचा अल्पपरिचय

अॅड. उज्ज्वल निकम हे मूळचे जळगावचे आहेत. निकम यांचे प्राथमिक, माध्यमिक आणि वकिलीचे शिक्षण हे जळगावमध्ये झाले आहे. उज्ज्वल निकम हे प्रख्यात वकील आणि अनेक मोठ्या खटल्यात त्यांनी सरकारचे वकील म्हणून काम केले आहे. तीन दशकांहून अधिक काळ ते वकिलीमध्ये आहेत.

उज्ज्वल निकम यांनी १९९१ मध्ये कल्याण रेल्वे बाँब स्फोट खटला, १९९३ मुंबई बॉम्बस्फोट, मुंबईवरचा दहशतवादी हल्ला या खटल्यात राज्याचे विशेष सरकारी वकिल म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याच्या न्यायालयीन प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी काम केले. तसेच कोपर्डी बलात्कार आणि खून खटल्यातही ते विशेष वकील होते.

उज्ज्वल निकम यांनी पुण्यातले राठी हत्याकांड, गेट वे ऑफ इंडिया आणि झवेरी बाजार बाँबस्फोट खटला, गुलशन कुमार खून प्रकरण, नदीमच्या हस्तांतरणाचा लंडनमधला खटला, खैरलांजी दलित हत्याकांडाचा खटला, गँगस्टर अबु सालेम प्रकरण, प्रमोद महाजन हत्या प्रकरण, मुंबईवरील दहशतवादी हल्ला, कोल्हापुरातले साखळी बाल हत्याकांड, शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरण, डेव्हिड हेडली यासारखे असंख्य खटले त्यांनी लढले असून यात उज्ज्वल निकम यांना यश देखील मिळाले आहे.

निकम यांना मिळाले पुरस्कार

  • २०१६ मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव

  • २०११ मध्ये राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते पुणे विद्यापीठाची मानद डॉक्टरेट

  • २००९ मध्ये राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते साताऱ्यातील स्वातंत्र्यसैनिक उंधाळकर पुरस्कार

  • अभिनेते सुनील दत्त यांनी केले होते प्रतिनिधित्व

अनेक वर्ष ज्येष्ठ अभिनेते स्व. सुनील दत्त यांनी उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यांच्यानंतर त्यांच्या कन्या प्रिया दत्त यांनीही येथून प्रतिनिधित्व केले. मागच्या दोन टर्ममध्ये पूनम महाजन या खासदार राहिल्या होत्या. मात्र, त्यांचा मतदारांशी फारसा संपर्क नसल्याने त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी नाकारण्यात आल्याचे समजते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in