लोकसभेची साखरपेरणी; मोदींचे नाशिक, मुंबईत भरगच्च कार्यक्रम: रोड शोने वेधले लक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून राज्यात राममय वातावरण तयार करण्याच्या दृष्टीने महायुतीने जोरदार प्रयत्न केले
लोकसभेची साखरपेरणी; मोदींचे नाशिक, मुंबईत भरगच्च कार्यक्रम: रोड शोने वेधले लक्ष

विशेष प्रतिनिधी/मुंबई, नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. नाशिक येथे आयोजित राष्ट्रीय युवक महोत्सवाच्या निमित्ताने रोड शोसह धार्मिक कार्यक्रम, विविध विकासकामे, मुंबईत अटल सेतूचे लोकार्पण, भूमिपूजन, उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने लोकसभेची जोरदार साखरपेरणी करण्याचा प्रयत्न केला. विशेषत: नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेऊन धार्मिक वातावरण निर्माण करतानाच अप्रत्यक्षरित्या हिंदुत्वाचा आवाज अधिक बुलंद करण्याचा प्रयत्न केला. मोदींनी अयोध्येत रामल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने आजपासून ११ दिवसांचे अनुष्ठान सुरू करून वातावरण निर्मितीला सुरूवात केली. एकंदरीत हा दौरा म्हणजे लोकसभेची भक्कम पायाभरणीच मानली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचे निमित्त होते नाशिक येथे आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनाचे आणि शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूच्या लोकार्पणाचे. या कार्यक्रमाचे निमित्त करून राज्यात लोकसभेची जोरदार तयारी करण्याच्या दृष्टीने वातावरण निर्मिती करण्यात आली. तसेच युवा महोत्सवालाही युवकांसोबत नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यातच त्यांनी रामकुंडाला भेट देऊन जलपूजा केली. तसेच काळाराम मंदिरात पूजा आणि स्वच्छता मोहीम राबवून एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला आणि राष्ट्रीय युवा महोत्सवातून युवा शक्तीवर लक्ष केंद्रीत करीत आगामी निवडणुकीच्या दृष्टीने युवा शक्तीला चुचकारण्याचा प्रयत्न केला. या निमित्ताने नाशिकमध्ये जोरदार बॅनरबाजी करून महायुतीचे एकप्रकारे शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

यासोबतच मुंबई ते कोकणपर्यंत मोदींचा संदेश पोचविण्याच्या दृष्टीने सर्वांत मोठा असलेला सागरी सेतू शिवडी न्हावा शेवा अटल सेतूच्या लोकार्पणाच्या निमित्ताने मु्ंबईत भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे चिर्ले नाक्यावर जय श्रीरामचा नारा देणारे होर्डिंग्ज, बॅनर उभारले आहेत. अयोध्येत २२ जानेवारी रोजी श्रीरामाच्या मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत आहे. त्या दृष्टीने देशभरात वातावरण निर्मिती केली जात आहे. त्यादृष्टीने राज्यातील महायुती सरकारने मुंबईत वातावरण निर्मिती केली आहे. त्यासाठी आधीपासूनच येथे जय्यत तयारी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक आता टप्प्यात आली आहे. तत्पूर्वीच मोदींच्या उपस्थित भव्य कार्यक्रम घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात मोदींच्या माध्यमातून हिंदुत्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीत कोण बाजी मारणार, हे येणारा काळच ठरवणार आहे.

जय श्रीरामचा जयघोष

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून राज्यात राममय वातावरण तयार करण्याच्या दृष्टीने महायुतीने जोरदार प्रयत्न केले. पंतप्रधान नाशिक दौऱ्यावर असताना रोड शो दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा उपस्थित नागरिकांनी जय श्रीरामचा जयघोष केला. मुंबईतदेखील अटल सेतूच्या लोकार्पणच्या निमित्ताने श्रीरामाचे मोठ-मोठे होर्डिंग्ज लावून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्याचबरोबर अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त ११ दिवसांचे अनुष्ठान सुरू करून भक्तीमय वातावरण केले आहे. त्यामुळे सर्वत्र जय श्रीरामचा जयघोष ऐकायला मिळाला.

logo
marathi.freepressjournal.in