विशेष प्रतिनिधी/मुंबई
पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या १० वर्षांपासून सत्तेत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची गॅरंटी दिली. परंतु आजतागायत उत्पन्न दुप्पट झाले नाही. शेतकऱ्यांचा मालाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. मात्र, हेच मोदी आता जाहिरातींतून ‘मोदी की गॅरंटी’ देत सुटले आहेत. पण ही गॅरंटी आणि प्रत्येक दिवशी पानभर जाहिराती जनतेच्या पैशांतून देत आहेत. हे सरकार शेतकरीविरोधी आहे. ते लोकशाहीला संकटात नेणारा कारभार करीत आहेत. त्यामुळे सामान्य माणसाचे अधिकार संपुष्टात येत आहेत. अशा स्थितीत लोकशाही, घटनेचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपली असून, यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे,” अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली.
लोणावळा येथे गुरुवारी राष्ट्रवादीच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. “ज्यांनी देश स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि स्वातंत्र्यानंतर देशाची घडी बसविली आणि देशाला विकासाच्या मार्गावर आणून सोडताना विकासाला चालना दिली, त्याच पंडित नेहरूंवर मोदी सातत्याने टीका करीत आहेत. स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू यांचे फार मोठे योगदान होते. त्यांची नोंद जाणकारांनी घ्यायची असते. परंतु मोदी मात्र, त्यांच्यावरच टीका करत आहेत,” असेही त्यांनी सांगितले.
“आमच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणणार असाल तर, मला शरद पवार म्हणतात”,असा सज्जड इशारा खा. शरद पवार यांनी अजितदादा गटाचे आ. सुनील शेळके यांना लोणावळा येथे बोलताना दिला.या सभेत त्यांनी नरेंद्र मोदींवरही सडकून टीका केली.
“मोदींच्या काळात शेतकरी उद्ध्वस्त झाला. मी देशाचा १० वर्षे कृषिमंत्री होतो. जेव्हा कृषिमंत्री झालो, तेव्हा देशात गहू, तांदूळ आयात केला जात होता. तेव्हा आपला देश कृषिप्रधान असताना ही परिस्थिती का यावी, असा प्रश्न मला पडला. तेव्हापासून मी कामाला लागलो. १० वर्षांनंतर भारत गहू, तांदूळ निर्यात करू लागला. पण आज शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून देतो, असे आश्वासन दिले जाते. परंतु प्रत्यक्षात शेतकरी देशोधडीला लागला आहे. आत्महत्या वाढल्या आहेत. शेतीमालाला भाव नाही, निर्यातीवर बंदी घालून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे काम त्यांनी केले. यांनी शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आणली, हीच मोदींची गॅरंटी आहे,” असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला.
आठवडाभरात मविआचे उमेदवार घोषित करणार
महाविकास आघाडीची बैठक झालेली आहे. पुढील आठवड्यात बैठक घेऊन उमेदवार घोषित केले जाणार आहेत. तुम्ही त्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना निवडून द्या. तेव्हाच खऱ्या अर्थाने लोकशाहीचे रक्षण होईल, असे शरद पवार म्हणाले.
भाजपकडून सत्तेचा गैरवापर
भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे. कुणाला ईडीचे समन्स, तर कुणाला तुरुंगात टाकायचे काम केले जात आहे आणि धमक्या देऊन भाजपमध्ये घेत वॉशिंग मशीनप्रमाणे स्वच्छ केले जात आहे. अशोकराव चव्हाण यांचा आदर्श घोटाळा भाजपने काढला, तेव्हा अशोक चव्हाण यांनी सातव्या दिवशी राजीनामा दिला आणि ते भाजपमध्ये जाऊन १५व्या दिवशी खासदार झाले, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.
आ. सुनील शेळके यांना इशारा
अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळके हे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणत असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आजच्या कार्यक्रमात मला शरद पवार म्हणतात, हे लक्षात असू द्या. माझ्या वाटेला गेलात तर मी कोणाला सोडत नाही, असा इशारा दिला.
शरद पवारांसारख्या नेत्याने धमकी देणे योग्य नाही-फडणवीस
मावळचे आमदार सुनील शेळके यांनी कार्यकर्त्यांना कथित दमदाटी केली म्हणून, शरद पवार यांनी ‘एकदा दमदाटी केलीस ठीक आहे. पण पुन्हा एकदा केलीस तर याद राख,’ असा दम शेळकेंना दिला. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे. “शरद पवार मोठेच आहेत. राजकारणात त्यांची जवळपास ५५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या स्तराच्या नेत्याने एका साध्या आमदाराला धमकी देणे योग्य नाही. त्यांना सल्ला देण्याएवढा मी मोठा नाही. पण त्यांनी पुनर्विचार करावा. ते जर अशाप्रकारे आमदारांना धमक्या द्यायला लागले तर त्यांचा स्तर खाली येईल,” असे फडणवीस म्हणाले आहेत. दुसरीकडे शिवसेना नेते रामदास कदम यांनी देखील महायुतीतील जागावाटपावरून केसाने आमचा गळा कापू नका, असा इशारा भाजपला दिला आहे. त्यावरही फडणवीस यांनी रामदास कदम यांना गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचा टोला लगावला आहे.