लोटेतील ‘लक्ष्मी ऑर्गेनिक’विरोधात एल्गार; कारखाना बंद करण्याची मागणी

‘कोकणचा निसर्ग आमचा श्वास’, ‘आमचा जीव मोठा, कारखाना बंद, नाहीतर आंदोलन तीव्र’, आदी घोषणांनी कंपनीचा परिसर सोमवारी दणाणला होता. लोटे एमआयडीसीतील लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीजमधील ‘पीफास’ हे घातक उत्पादन बंद झालेच पाहिजे, या मागणीसाठी लक्ष्मी ऑर्गेनिकच्या विरोधात विराट मोर्चा काढण्यात आला.
लोटेतील ‘लक्ष्मी ऑर्गेनिक’विरोधात एल्गार; कारखाना बंद करण्याची मागणी
X(@airnews_mumbai)
Published on

सुनील नलावडे/रत्नागिरी

‘कोकणचा निसर्ग आमचा श्वास’, ‘आमचा जीव मोठा, कारखाना बंद, नाहीतर आंदोलन तीव्र’, आदी घोषणांनी कंपनीचा परिसर सोमवारी दणाणला होता. लोटे एमआयडीसीतील लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीजमधील ‘पीफास’ हे घातक उत्पादन बंद झालेच पाहिजे, या मागणीसाठी लक्ष्मी ऑर्गेनिकच्या विरोधात विराट मोर्चा काढण्यात आला.

कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी पर्यावरण संघर्ष समिती, जन आक्रोश समिती यांनी एकत्र येऊन प्रशासनाला आणि सरकारला जाग आणण्यासाठी सोमवारी हा मोर्चा काढला.

इटलीमधील मिटेनी कंपनीत ‘पीफास’ या घातक रसायनाचे उत्पादन केले जाते. मात्र, त्या प्रक्रियेच्या दरम्यान तयार होणारे टाकाऊ रासायनिक सांडपाणी योग्य प्रक्रिया न करता ते थेट नदीत सोडण्यात येते. त्यामुळे नदीतील पाणी दूषित होऊन आरोग्याचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर हे विष आमच्या कोकणात आणून मानवी जीवन आणि कोकणचा निसर्ग उद्ध्वस्त करण्यामागे सरकारचा हेतू काय, असा संतप्त सवाल आंदोलनात व्यक्त केला गेला.मनसे सोबतच आणखीही काही संघटना या मोर्चात सहभागी झाल्या.

हा मोर्चा मुंबई गोवा महामार्गावरील एक्सल फाटा येथून निघाला आणि पोलिसांनी निश्चित केलेल्या जागेपर्यंत पोहोचला.

यावेळी धरणे आंदोलनाला बसलेले अशोक जाधव, राजेंद्र आंब्रे, उदय घाग, कांचन चाळके, रवींद्र गोवळकर, अविनाश आंबे, दिलीप घाग, सचिन चाळके, संजय चाळके, पं.स. सदस्य अँजय चाळके, मनसे दक्षिण रत्नागिरी संपर्क उपाध्यक्ष मनीष पात्रे, महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना खेड तालुका अध्यक्ष मंगेश चाळके, आम आदमी पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासह इतरही अनेक संघटना आणि शेकडो कोकणवासीय महिला आणि पुरुष आंदोलन उपस्थित होते.

तीन महिने चालू असलेल्या लक्ष्मी ऑर्गानिक विरोधातील आंदोलनाकडे प्रशासन किंवा कोणीही स्थानिक लोकप्रतिनिधी गांभीर्याने पाहत नसून कोकणी जनतेच्या जीवाशी खेळ करत आहेत, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला. आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांची निवेदन प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार यांच्याकडे दिले आणि मोर्चाची सांगता झाली.

७६ दिवसांपासून आंदोलन

दरम्यान, या मागणीसाठी गेल्या ७६ दिवसांपासून कारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ धरणे आंदोलन सुरू आहे. अशोक जाधव आणि राजेंद्र आंब्रे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाला आता जिल्हाभरातूनच नव्हे तर राज्यभरातून पाठिंबा मिळू लागला आहे. प्रशासनाने अद्याप ठोस दखल न घेतल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे

आंदोलकांचा संताप व सवाल

● आम्ही लोकप्रतिनिधींना निवडून देतो आणि ते आमच्या जीवनाचा आणि निसर्गाचा लिलाव करत असतील तर आम्ही शांत बसणार नाही.

● पीफास रसायनाच्या निर्मितीमधून किंवा प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारचे प्रदूषण अथवा जीवितहानी झाली तर त्यावर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ किंवा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळ इतकेच काय, तर सरकारकडे सुद्धा कायदा अस्तित्वात नाही. मग असे असताना भविष्यात काही दुर्घटना घडली तर या कारखान्यावर कारवाई करणे शक्य होईल का?

● हा कारखाना कोणाच्या फायद्यासाठी आणि आशीर्वादाने आमच्या कोकणवासीयांच्या माथी मारला जात आहे?

logo
marathi.freepressjournal.in