वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने रोजगाराची मोठी संधी राज्याने गमावली. त्यातच राज्यातील विविध विभागातील नोकरभरती रखडल्याने तरुणांमध्ये प्रचंड रोष आहे. या रोषाचा सामना शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करावा लागला. हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त फडणवीस नांदेडमध्ये आले असताना एका कार्यक्रमादरम्यान तरुणांनी त्यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली. ‘पोलीस भरती झालीच पाहिजे’, ‘५० खोके, एकदम ओके’, अशा घोषणा तरुणांनी यावेळी दिल्या. यावेळी आक्रमक झालेल्या तरुणांवर पोलिसांनी लाठीमार केला.
नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवनपट उलगडून दाखवणाऱ्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन फडणवीस यांनी केले. या कार्यक्रमानंतर फडणवीस सभागृहाबाहेर येत असतानाच तरुणांनी फडणवीसांना घेराव घालण्याचा प्रयत्न करत घोषणाबाजी केली. त्यामुळे घटनास्थळी गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी लाठीमार करत तसेच, काही जणांना ताब्यात घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.