पवारांवर निष्ठा कायम! सुप्रिया सुळे नेत्या बनू शकल्या नाहीत याची खंत : सोनिया दुहान

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार यांना खंबीरपणे साथ देणारे राष्ट्रीय पातळीवरील युवा नेतृत्व म्हणजे सोनिया दुहान. अनेक जण पक्ष सोडून गेले. परंतु दुहान यांनी कधीही पक्ष सोडण्याचा विचार केला नाही. परंतु...
सोनिया दुहान
सोनिया दुहानछायाचित्र : एक्स / @ANI

विशेष प्रतिनिधी/मुंबई

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार यांना खंबीरपणे साथ देणारे राष्ट्रीय पातळीवरील युवा नेतृत्व म्हणजे सोनिया दुहान. अनेक जण पक्ष सोडून गेले. परंतु दुहान यांनी कधीही पक्ष सोडण्याचा विचार केला नाही. परंतु आता त्या अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. परंतु त्यांनी याबाबत स्पष्टीकरण देत आपली शरद पवार यांच्यावरच निष्ठा कायम ठेवली आहे. परंतु खासदार सुप्रिया सुळे या कधीच आमच्या लिडर बनू शकल्या नाहीत, याची खंत आहे, अशा शब्दांत शरद पवार गटाच्या राष्ट्रीय पातळीवरील युवा नेत्या सोनिया दुहान यांनी नाराजी व्यक्त केली.

एका खासगी वृत्तवाहिनीशी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही खंत बोलून दाखविली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे राष्ट्रीय युवा नेता धीरज शर्मा यांनी शरद पवार गटाची साथ सोडत नुकताच अजित पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. त्यांच्यासोबत आता युवा नेत्या सोनिया दुहान याही अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. तसेच मुंबईत नुकत्याच झालेल्या अजित पवार गटाच्या बैठकीत त्यांनी मागच्या दाराने प्रवेश करून हजेरी लावली असल्याचेही सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर एका खासगी वाहिनीशी बोलताना दुहान यांनी माझी शरद पवार यांच्यावर निष्ठा आहे. यापुढेदेखील ही निष्ठा कायम राहील. अर्थात, आमच्यासाठी शरद पवारच आमचे लीडर आहेत. शरद पवार आमचे नेते होते, आहेत आणि यापुढेही राहतील. त्यामुळे इतर पक्षात जाण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु खा. सुप्रिया सुळे आमच्या नेत्या बनू शकल्या नाहीत, अशी खंतही त्यांनी बोलून दाखविली.

राष्ट्रवादी शरद पवार गटातील लेडी सिंघम अशी युवा नेत्या सोनिया दुहान यांची ओळख आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीदरम्यान महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. राष्ट्रीय पातळीवरील बैठकीत त्यांचा नेहमीच पुढाकार असे. एवढेच नव्हे, तर पहाटेच्या शपथविधीवेळी राष्ट्रवादीचे काही आमदार दिल्लीत दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी एक-एका आमदाराला पकडून पवारांना मदत केली होती. आता त्याच लेडी सिंघम शरद पवार गटातून बाहेर पडणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यावर त्यांनी एका खासगी वाहिनीशी बोलताना सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.

माझी शरद पवारांवर निष्ठा कायम आहे, मी पक्ष सोडलेला नाही, असे सोनिया दुहान यांनी स्पष्ट केले. मी इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही. ज्यावेळी अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या काही नेत्यांनी वेगळा निर्णय घेतला, त्यावेळी खा. सुप्रिया सुळे त्या ठिकाणी दिसल्या होत्या. मग त्यांनीही पक्ष सोडला, असे म्हणायचे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

पवारांची मुलगी म्हणून आदर

खा. सुप्रिया सुळे यांचा शरद पवार यांच्या कन्या म्हणून सन्मान आहे. मात्र, त्या कधीही आमच्या प्रमुख होऊ शकल्या नाहीत. लीडर होण्यात त्या कमी पडल्या, अशी खंत सोनिया दुहान यांनी बोलून दाखविली. एवढेच नव्हे, तर सुप्रिया सुळे यांनी यासंबंधी मंथन करण्याची गरज आहे. लोक त्यांना का सोडून जात आहेत याचा विचार करावा, असेही दुहान म्हणाल्या.

logo
marathi.freepressjournal.in