चांदवडच्या राहूड घाटात LPG टँकर उलटल्याने गॅस गळती; परिसरात घबराट; मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक अन्य मार्गांनी वाळवली

भारत गॅसच्या बुलेट टँकरला ट्रकने कट मारल्याने टँकर उलटून हा अपघात झाला. अपघातात गॅस टँकरमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून गॅस गळतीमुळे आजूबाजूच्या गावांना तसेच रस्त्यावरील ढाबा चालकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
चांदवडच्या राहूड घाटात LPG टँकर उलटल्याने गॅस गळती; परिसरात घबराट; मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक अन्य मार्गांनी वाळवली
Published on

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड तालुक्यातील राहूड घाटात एलपीजी टँकर उलटल्याने गॅस गळती झाली. सोमवारी रात्री भारत गॅसच्या बुलेट टँकरला ट्रकने कट मारल्याने टँकर उलटून हा अपघात झाला. यामुळे परिसरात एकाच घबराट निर्माण झाली. अपघातानंतर महामार्गावरून मालेगावकडे जाणारी सर्व वाहतूक मनमाडमार्गे वळवण्यात आली तर मालेगावकडून येणारी वाहतूक चिंचवे उमराणे दरम्यान बंद करण्यात आली आहे. गॅस गळती थांबवण्यासाठी मनमाड, सिन्नर येथून पथक रवाना करण्यात आले. अपघातात गॅस टँकरमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून गॅस गळतीमुळे आजूबाजूच्या गावांना तसेच रस्त्यावरील ढाबा चालकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहे.

प्राप्त माहितीनुसार, सोमवारी रात्री राहूड घाटाच्या उतारावर असताना भारत गॅसच्या बुलेट टँकरला समोरून आलेल्या ट्रकने कट मारली. त्यामुळे अनियंत्रीत होऊन एलपीजी टँकर दोन दिवसांपूर्वी अपघातग्रस्त झालेल्या ट्रेलरवर धडकला. याचवेळी विरुद्ध दिशेने येणारी एक मोटारगाडीही टँकरला धडकली. अपघातानंतर एलपीजी टँकरमधून गॅस गळती सुरु झाली. गॅसचा वास येवू लागल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. यावेळी घटनास्थळी पोहचलेल्या पोलीस पथकाने दोन्ही बाजूची वाहतूक थांबवून ती अन्य मार्गाने वळवली आहे. सदर प्रकार बीपीसीएल कंपनीला कळवल्यानंतर तिचे पथकही दाखल झाले आहे. मंगळवारी सकाळपर्यंत गॅस गळती सुरु होती. महामार्गावरील वाहतूकदेखील विस्कळीत होती.

"सोमवारी रात्री सुरु झालेली गॅस गळती थांबवण्यासाठी प्रशासन आणि पोलीस यांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक कोंडीचा जनसामान्यांना फटका बसू नये म्हणून वाहतूक अन्य मार्गांनी वळवण्यात आली आहे. धुळ्याकडून येणारी वाहने मनमाडमार्गे चांदवडला तर नाशिकहून जाणारी वाहने चांदवड-मनमाड-धुळे या मार्गे वळवण्यात आली आहेत. गॅस गळती लवकरात लवकर थांबावी, यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न होत असल्याने लवकरच त्यामध्ये यश येईल." - मंदार कुलकर्णी, तहसीलदार , चांदवड

logo
marathi.freepressjournal.in