येत्या ८ नोव्हेंबर २०२२ला वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण दिसणार आहे. (Lunar Eclipse 2022) भारतात प्रामुख्याने हे ग्रहण ईशान्येकडून राज्यात दिसणार आहे. महाराष्ट्रात मात्र या ग्रहणातच चंद्रोदय होणार आहे. त्यामुळे खगोलप्रेमींना चंद्रग्रहणाचा अदभूत नजारा थेट डोळ्यांनी पाहता येणार आहे. हे चंद्रग्रहण दुपारी २.३९ वाजता सुरू होणार आहे. दुपारी ३.४७ ते ५.१२ या वेळेमध्ये चंद्रबिंब पूर्णपणे पृथ्वीच्या छायेत आल्याने खग्रास स्थिती निर्माण होईल. त्यानंतर संध्याकाळी ६ वाजून १९ मिनिटांनी ग्रहण सुटणार आहे.
महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यातून ०५.३० वाजता तर मुंबई येथून ०६.०१ वा. चन्द्रोदयातच ग्रहण सुरु होणार आहे. महाराष्ट्रात पूर्व प्रदेशात गडचिरोली येथे ७०% टक्के तर पश्चिम प्रदेशात मुंबई येथे १५ % ग्रहण दिसेल. कोलकात्यासह पूर्व भारतातील काही भागांमध्ये संपूर्ण चंद्रग्रहण दिसेल. तर उर्वरित भागामध्ये आंशिक चंद्रग्रहण दिसेल. नवी दिल्ली येथे सुमारे ५ वाजून ३१ मिनिटांनी आंशिक चंद्रग्रहण पाहता येणार आहे. यावेळी चंद्राचा ६६% भाग अस्पष्ट असेल. तर बेंगळुरूमध्ये ५ वाजून ५७ मिनिटांनी पूर्ण चंद्रोदय होईल. यावेळी चंद्राचा २३% भाग पृथ्वीच्या सावलीने झाकलेला असेल.