साताऱ्यातील माणवासीयांच्या घशाला कोरड

गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत यावर्षी उष्णतेच्या लाटेने कहर केला आहे. दुष्काळी समजल्या जाणाऱ्या माण तालुक्यातील प्रमुख तलावांच्या पाणीसाठ्यात ऐन उन्हाळ्यात लक्षणीय घट झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
साताऱ्यातील माणवासीयांच्या घशाला कोरड
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

रामभाऊ जगताप/कराड

गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत यावर्षी उष्णतेच्या लाटेने कहर केला आहे. दुष्काळी समजल्या जाणाऱ्या माण तालुक्यातील प्रमुख तलावांच्या पाणीसाठ्यात ऐन उन्हाळ्यात लक्षणीय घट झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

माण तालुक्यातील दहा मध्यम व लघु प्रकल्पांपैकी सहा तलावांत केवळ १४.९३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे तर लोधवडे, जाशी, महाबळेश्वरवाडी व मासाळवाडी हे चार तलाव सध्या कोरडे ठणठणीत पडल्याचे दहिवडी येथील पाटबंधारे उपविभागीय कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

जिहे कठापूरचे पाणी आंधळी धरणातून माणगंगेत सोडल्याने दिलासा मिळाला असला, तरी तालुक्यातील काही गावांमध्ये टँकर सुरू असल्याने टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

माण तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४५० मिलीमीटर असून गेल्या काही वर्षांत तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद होत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने विहिरींसह मध्यम व लघु प्रकल्प तुडुंब भरले होते. परंतु, यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने तालुक्याच्या काही भागांत टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यातच यावर्षीच्या उन्हाळ्याने गेल्या शतकातील उष्णेतेचे रेकॉर्ड मोडल्याने माणमधील पाराही ४० अंशापर्यंत चढला आहे. उष्णतेच्या तीव्रतेने उपलब्ध पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याने तलावातील पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाली असून लोधवडे, जाशी, महाबळेश्वरवाडी व मासाळवाडी हे चार तलाव कोरडे ठणठणीत पडले आहेत. तालुक्यातील काही गावांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असून सध्या तालुक्यातील ३० हून अधिक गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच लहान-मोठे तलाव, बंधारे, विहिरींच्या पाणीसाठ्यातही घट झाल्याचे चित्र आहे.

मे च्या सुरुवातीलाच सातारा ४०.७ अंशावर स्थिर

सातारा जिल्ह्यात उन्हाळी झळा तीव्र झाल्या असून सातारासह कराड शहराचा पारा गेल्या तीन दिवसांपासून ३९ ते ४०.७ अंशावर स्थिर आहे. यामुळे नागरिक ऊन आणि उकाड्याने हैराण झाले आहेत. तसेच जिल्ह्याच्या पूर्व भागातील तापमान कमालीचे वाढले असल्याने तेथील जनजीवन विस्कळीत होण्याची वेळ आलेली आहे. सातारा जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून कडाक्याचे ऊन पडू लागले आहे. मागील काही वर्षांची तुलना करता यंदाचा एप्रिल महिना अधिक तापदायक ठरला आहे. कारण, सतत पारा वाढता वाढता वाढत चाललेला आहे. सातारा शहर हे पश्चिम भागात असलेतरी पारा कायमच ४० अंशावर राहिला आहे. त्यातच मागील तीन दिवस तापमान ४०.७ अंश नोंद होत गेले. यामुळे सातारकरांना उन्हाळी झळांशी सामना करावा लागतोय. तसेच घरातून बाहेर पडणेही मुश्कील झाले आहे तर रात्रीही उकाड्यामुळे हैराण होण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, जिल्ह्याच्या पूर्व दुष्काळी भागातील माण, खटाव आणि फलटण तालुक्यातील पारा ४२ अंशावर गेला आहे. यामुळे सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढत जाते. परिणामी दुपारी दोन ते चार या वेळेत उन्हाचा कहर असतो त्यामुळे घराबाहेर पडणेही अवघड होऊन झाल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली. मे महिन्यातच ही अवस्था असताना आगामी काळात अशीच अवस्था राहण्याची भीती व्यक्त केली जात आहेे.

logo
marathi.freepressjournal.in