कोरोना लस देऊन देश सुरक्षित केला; नारायण राणे यांच्या प्रचार सभेत अमित शहा यांचे वक्तव्य

तुम्ही कोरोनावर राजकारण करता. पण आम्ही कोरोनावर लस मोफत देऊन देशवासीयांना सुरक्षित केले, असे म्हणत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
कोरोना लस देऊन देश सुरक्षित केला; नारायण राणे यांच्या प्रचार सभेत अमित शहा यांचे वक्तव्य

रत्नागिरी /सुनील नलावडे

तुम्ही कोरोनावर राजकारण करता. पण आम्ही कोरोनावर लस मोफत देऊन देशवासीयांना सुरक्षित केले, असे म्हणत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. अमित शहा यांनी शुक्रवारी कोकणात नारायण राणे यांच्या प्रचार सभेत भाषण केले. असली शिवसेना कोणती, ते ही निवडणूक सिद्ध करेल, असा टोलाही त्यांनी लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचा उच्चार गृह मंत्री अमित शहा यांनी केला. 

सभेच्या सुरुवातीला भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ, मंत्री दीपक केसरकर, रवींद्र चव्हाण यांची मार्गदर्शन पर भाषणे झाली. भाजप प्रदेशाध्यक्ष बावन कुळे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर  रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मार्गदर्शन करताना अमित शहा याना अभिवचन दिले की, सिंधुदुर्ग सारखेच रत्नागिरी मतदार संघात सुद्धा सिंधुदुर्ग एवढे फार मोठे मताधिक्य महायुतीला मिळेल याची खात्री दिली व त्यांचे रत्नागिरीत आम्ही स्वागत करतो असे म्हणाले. तसेच मुखमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले या बद्दल ऋण व्यक्त केले. अमित शहा यांच्याकडे केंद्रीय सहकार खाते असल्याने आचार संहितेनंतर कोकणला मोठा रोजगार देणारा प्रकल्प द्या, म्हणजेच तो विरोधकांच्या टीकेला उत्तर देणारा ठरेल, असे साकडे घातले.

त्यानंतर महायुतीचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार नारायण राणे यांनी उपस्थित जन समुदायाला साद घालत कमळ या निशाणीवर मतदान करून मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आवाहन केले. आपले कोकण निसर्गरम्य आहे. तेथे पर्यटन आहे. कोकणचा कॅलिफोर्निया होईल असे म्हटले जाते. त्याऐवजी कॅलिफोर्नियाच्या लोकांनी म्हटलं पाहिजे की त्यांचा कोकण झाला पाहिजे. अशी प्रगती विकास करू. त्यासाठी सेवा करण्याची संधी मला द्या, अशी भावनिक हाक राणे यांनी दिली.

कोकणात महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेनेत भाऊबंदकी निर्माण झाले असल्याचे गेले दोन दिवस चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे त्याचे पडसाद व फटका नारायण राणे याना बसेल अशी चर्चा जोरदारपणे सुरू होती. त्यावर आज अमित शहा यांच्या उपस्थितीत पडदा पडला. उद्योग मंत्री उदय सामंत व त्यांचे भाऊ किरण सामंत व महायुतीतील घटक पक्ष व त्यांचे पदाधिकारी यांनी आज महायुती एक संघ असल्याचे दाखऊन दिले. मंचावरील सुसूत्र पद्धतीने सभा पूर्ण करायचे काम सामंत बंधूनी सकाळ पासून उपस्थित राहून नियोजनाचे काम पार पाडले. महायुतीच्या स्थानिक पदाधिकारी व घटकांनी तसेच बाळ माने, राजेश सावंत, प्रमोद जठार, राजन तेली आदीनी सभा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

logo
marathi.freepressjournal.in