माढ्यात फडणवीसांनीही टाकला डाव; अभिजित पाटील, धवलसिंह भाजपच्या गळाला?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ३० एप्रिल रोजी माळशिरसला सभा आहे. तत्पूर्वी फडणवीस यांनी दोन बड्या नेत्यांना गळाला लावल्याची चर्चा आहे.
(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)

विशेष प्रतिनिधी/मुंबई

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघात थेट माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना आपल्यासोबत घेऊन भाजपचे गणित बिघडवले. परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता त्यापुढे जाऊन दुसरा डाव टाकत थेट मोहिते पाटील आणि शरद पवार यांनाच धक्का दिला. फडणवीस यांनी रविवारी माढा लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला. तत्पूर्वी या मतदारसंघात येण्याअगोदरच जोरदार फिल्डिंग लावून कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील आणि राष्ट्रवादीचे अभिजित पाटील यांच्या कारखान्यावर धाडी टाकून त्यांनाही आपल्या बाजूने खेचण्यात यश मिळविल्याची चर्चा आहे. त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माढा लोकसभा मतदारसंघात वाकाव, सांगोला आणि अकलूज अशा तीन ठिकाणी प्रचारसभा पार पडल्या. या सभांना येण्यापूर्वी फडणवीस यांनी माढा लोकसभा मतदारसंघात डाव टाकून कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते अभिजित पाटील यांना गळाला लावण्यासाठी डाव टाकला. या दौऱ्यात फडणवीस यांनी थेट अभिजित पाटील आणि धवलसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली. त्यामुळे ते भाजपमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ३० एप्रिल रोजी माळशिरसला सभा आहे. तत्पूर्वी फडणवीस यांनी दोन बड्या नेत्यांना गळाला लावल्याची चर्चा आहे. फडणवीस यांनी अकलूज येथे आल्यानंतर चहापानाच्या निमित्ताने धवलसिंह मोहिते पाटील यांची घरी जाऊन भेट घेतली. त्यामुळे ते भाजपमध्ये जाऊ शकतात. हा कॉंग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अभिजित पाटील यांनी मोठ्या कष्टातून विठ्ठल सहकारी साखर कारखाना हाती घेतला आणि सभासदांचे हित लक्षात घेऊन पंढरपूर, सांगोला तालुक्यात ताकदीने तयारीला लागलेले असताना शिखर बँकेच्या ४५० कोटींच्या थकित कर्जाच्या नावाखाली त्यांना कोंडीत पकडले आणि शिखर बँकेच्या माध्यमातून त्यांची कोंडी करून थेट दोन दिवसांपूर्वी कारखान्यावरच धाड टाकायला लावून साखरेचे तीन गोडावून सील केले. या गोडावूनमध्ये १ लाखापेक्षा जास्त साखर पोत्यांचा साठा आहे. आधीच शेतकºयांची उसाची बिले द्यायची आहेत. त्यात गोडावूनचे सील काढायचे असेल, तर कर्जाच्या २५ टक्के म्हणजेच १०० कोटी रुपये जमा करावे लागू शकतात. कारखान्याकडे पैसै नाहीत. एकीकडे शेतकऱ्यांचे हित जोपासायचे आणि दुसरीकडे साखरेच्या गोडावूनला सील केल्याने ते आर्थिक कोंडीत सापडले आहेत. या संकटातून मार्ग काढण्यासाठी ते भाजपची वाट धरण्याची शक्यता आहे.

दोन दिवसांपूर्वीच पाटील यांच्या कारखान्याच्या गोदामाला सील

दोन दिवसांपूर्वी करमाळ्यात नारायण जगताप यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेशाचा कार्यक्रम सुरू असताना अभिजित पाटील तेथे होते. त्यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे साखरेचे ३ गोडावून सील केले. त्यामुळे अभिजित पाटील यांना धक्का बसला. त्यामुळे ते चांगलेच गोत्यात आले. आता त्यांनी भाजपचा मार्ग धरल्यास माढ्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आणि सोलापूरच्या कॉंग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in