सागर बंगल्यावर बैठकांचे सत्र; नाराजांची फौज दाखल, समजूत काढण्यासाठी फडणवीसांचा पुढाकार

महायुतीतील नेत्यांना गुरुवारी सागर बंगल्यावर बोलावले. सागर बंगल्यावर बऱ्याच राजकीय नेत्यांनी चांगलीच गर्दी केली होती.
सागर बंगल्यावर बैठकांचे सत्र; नाराजांची फौज दाखल, समजूत काढण्यासाठी फडणवीसांचा पुढाकार
Published on

विशेष प्रतिनिधी/मुंबई : महायुतीत भाजपसोबत शिवसेना, राष्ट्रवादीचा समावेश झाल्याने उमेदवारीवरून अनेक मतदारसंघांत पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे जागावाटपाचा पेच सुटता सुटेना, अशी स्थिती झाली आहे. त्यातच बऱ्याच मतदारसंघांतून महायुतीतील बरेच नेते, पदाधिकारी नाराज आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कुरघोड्यांचे राजकारण अधिक प्रमाणात पाहायला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराज नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे महायुतीतील नेत्यांना गुरुवारी सागर बंगल्यावर बोलावले. सागर बंगल्यावर बऱ्याच राजकीय नेत्यांनी चांगलीच गर्दी केली होती.

नगर लोकसभा मतदारसंघात पुन्हा राधाकृष्ण विखे यांचे पुत्र डॉ. सुजय विखेंना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपमध्ये नाराजी वाढली आहे. अगोदरच आमदार राम शिंदे विखेंना विरोध करीत आहेत. त्यातच अनेक भाजप नेत्यांनी खा. विखेंना विरोध केला आहे. त्यामुळे नगरमध्ये विखेंसमोर मोठे आव्हान असणार आहे. तीच स्थिती माढा लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळते. माढ्यातही विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या घराण्याने या उमेदवारीला विरोध केला.

त्यातच राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर यांचा तर आधीपासूनच विरोध आहे. त्यामुळे महायुतीतील नाराज नेते नाईक निंबाळकर यांना विरोध करीत आहेत. याशिवाय राज्यातील बऱ्याच मतदारसंघांत अशीच स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या नेत्यांनी थेट सागर बंगला गाठून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. सर्वांच्या तक्रारी ऐकून घेऊन फडणवीस यांनी सर्वांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु यातून कितपत मनपरिवर्तन होतेय, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

यासोबतच साताऱ्यातही उमेदवारीवरून बरेच नाराजीनाट्य रंगले आहे. एकीकडे भाजप नेते उदयनराजे भोसले उमेदवारीसाठी आग्रही आहेत. दुसरीकडे साताऱ्याची जागा अजित पवार गटाला हवी आहे आणि शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव हेही कोणत्याही परिस्थितीत साताऱ्यातून लढणार, अशी भूमिका घेत आहेत. त्यामुळे साताऱ्यातही तिढा निर्माण झाला आहे. त्यातल्या त्यात साताऱ्याची जागा राष्ट्रवादीला हवी आहे. परंतु उदयनराजे भूमिकेवर ठाम असल्याने अडचण झाली आहे. या पार्श्वभूमीवरही सागर बंगल्यावर अनेक नेत्यांनी हजेरी लावली. त्यामुळे गुरुवारी अनेक नाराज नेत्यांशी थेट संवाद साधून फडणवीस यांनी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

नगरमध्ये अंतर्गत वाद

नगर लोकसभा मतदारसंघात डॉ. सुजय विखे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे ते दुसऱ्यांदा खासदार होण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र, यावेळी त्यांना विरोधी पक्षांपेक्षा पक्षांतर्गत विरोधक जास्त असल्याचे समोर आले आहे. त्यातल्या त्यात आमदार राम शिंदे यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. परंतु त्यांना उमेदवारी मिळाली नाही. मात्र, ते आधीच विखे विरोधक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे विखेंची अडचण होऊ शकते. या वादावर तोडगा काढण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखेही ‘सागर’वर दाखल झाले होते.

logo
marathi.freepressjournal.in