वंचितला नवी ऑफर : ॲड. प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न; राज्यसभेवर पाठवून मंत्रिपद देऊ

वंचित बहुजन आघाडीने आतापर्यंत २० पेक्षा जास्त उमेदवार जाहीर केले आहेत. याचा फटका महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला होण्याची शक्यता अधिक आहे. २०१९ मध्ये वंचितमुळेच काँग्रेसला जवळपास ९ जागा गमवाव्या लागल्या होत्या. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
वंचितला नवी ऑफर : ॲड. प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न; राज्यसभेवर पाठवून मंत्रिपद देऊ

विशेष प्रतिनिधी/मुंबई

वंचित बहुजन आघाडीला ‘मविआ’सोबत घेण्यासाठी पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी आता त्यांना नवी ऑफर देण्यात आली आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आता माघार घ्यावी. त्यांना राज्यसभेवर पाठवून केंद्रात सत्ता आली तर मंत्रिपद देऊ, असे काँग्रेसने म्हटले आहे. या नव्या ऑफरवर आता अ‍ॅड. आंबेडकर विचार करणार का? यावर महाराष्ट्राच्या राजकारणातील पुढील गणिते अवलंबून असतील.

वंचित बहुजन आघाडीने आतापर्यंत २० पेक्षा जास्त उमेदवार जाहीर केले आहेत. याचा फटका महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला होण्याची शक्यता अधिक आहे. २०१९ मध्ये वंचितमुळेच काँग्रेसला जवळपास ९ जागा गमवाव्या लागल्या होत्या. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

यापूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही, अजूनही वेळ गेलेली नाही. अ‍ॅड. आंबेडकर यांनी काँग्रेससोबत यावे, असे आवाहन केले होते. एवढेच नव्हे, तर तुमची काय मागणी आहे, ती पूर्ण करण्याची जबाबदारी माझी असल्याचे ते म्हणाले होते. याशिवाय ज्येष्ठ काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांनीही अ‍ॅड. आंबेडकर यांना काँग्रेससोबत येण्याची ऑफर दिली होती. परंतु, त्यावर अ‍ॅड. आंबेडकर यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

दरम्यान, काँग्रेस नेते अनिस अहमद यांनीही आता अ‍ॅड. आंबेडकर यांना नवी ऑफर दिली असून, कोणत्याही परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायचेच, अशी भूमिका घेतली आहे. ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांनी आता माघार घ्यावी. त्यांना आम्ही राज्यसभेवर पाठवू आणि केंद्रात मंत्रिपदही देऊ. लोकसभा निवडणुकीत अ‍ॅड. आंबेडकर स्वबळावर निवडून येऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी काँग्रेसला पाठिंबा द्यावा. आम्ही त्यांना राज्यसभेवर घेऊ. त्यामुळे त्यांनी याचा विचार करावा. असे सांगतानाच त्यांनी अ‍ॅड. आंबेडकर हा प्रस्ताव स्वीकारतील, असा विश्वासही व्यक्त केला.

ही एकत्र येऊन लढण्याची वेळ!

मतविभाजनामुळे भाजपला फायदा होत आहे. त्यामुळे सध्याची वेळ एकत्रित येऊन लढायची आहे, यासाठी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेससोबत यावे, असे आवाहन नाना पटोले यांनी याअगोदर केले होते.

logo
marathi.freepressjournal.in