सांगलीवरून राऊत-पटोले यांच्यात शाब्दिक युद्ध

काँग्रेसच्या नेत्यांनी आता नौटंकी थांबवावी आणि प्रचारात सहभागी व्हावे. सांगलीत चंद्रहार पाटील हेच उमेदवार असतील. माझी हायकमांडच्या नेत्यांशी चर्चा झाली असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.
सांगलीवरून राऊत-पटोले यांच्यात शाब्दिक युद्ध

प्रतिनिधी/मुंबई

सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत सध्या महाभारत सुरू आहे. सांगलीची उमेदवारी शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केल्यानंतर काँग्रेसही या जागेसाठी आग्रही आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.

काँग्रेसच्या नेत्यांनी आता नौटंकी थांबवावी आणि प्रचारात सहभागी व्हावे. सांगलीत चंद्रहार पाटील हेच उमेदवार असतील. माझी हायकमांडच्या नेत्यांशी चर्चा झाली असल्याचे राऊत म्हणाले आहेत. तर “राऊत यांनी छोट्या कार्यकर्त्यांप्रमाणे विधाने करू नयेत. हा प्रश्न सामोपचाराने नेत्यांच्या पातळीवर सुटू शकतो. उद्यापर्यंत यावर पडदा पडलेला असेल,” असे नाना पटोले यांनी सुनावले आहे.

सांगलीच्या जागेवरून आघाडीत मिठाचा खडा पडतो की काय, इतकी स्थिती निर्माण झाली आहे. सांगली हा काँग्रेसचाच परंपरागत मतदारसंघ असल्याचे काँग्रेस नेत्यांकडून सांगण्यात येत असतानाच राऊत यांनी परस्पर चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित केली आणि वादाचा भडका उडाला. विश्वजीत कदम यांनी तर हा मतदारसंघ काँग्रेस कदापि सोडणार नाही, अशी आग्रही भूमिका घेतली होती. दुसरीकडे संजय राऊत यांनी चंद्रहार पाटील यांना सोबत घेत प्रचारही सुरू केला आहे.

संजय राऊत म्हणाले, “काँग्रेस नेत्यांनी आता नौटंकी करणे बंद करावे आणि प्रचारात सहभागी व्हावे. अन्यथा सांगलीतील जनता तुम्हाला माफ करणार नाही.” त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील राऊत यांना सुनावले आहे. “संजय राऊत हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी अशा प्रकारे छोट्या कार्यकर्त्यांसारखी वक्तव्ये करू नयेत. सांगलीच्या जागेचा प्रश्न सामोपचाराने चर्चा करून सोडविला जाऊ शकतो. उद्यापर्यंत या प्रश्नावर तोडगा निश्चित निघेल,” असे पटोले म्हणाले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in