मविआचे भिजत घोंगडे; बैठकीत वंचितच्या जागांबद्दल चर्चाच नाही!

महाविकास आघाडीच्या जागावाटपाची महत्त्वपूर्ण चर्चा मुंबईत पार पडली. उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. मात्र...
मविआचे भिजत घोंगडे; बैठकीत वंचितच्या जागांबद्दल चर्चाच नाही!
Published on

मुंबई : महाविकास आघाडीच्या जागावाटपाची महत्त्वपूर्ण चर्चा मुंबईत पार पडली. उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत वंचितला सोडावयाच्या जागांबाबत चर्चा न झाल्याने वंचित बहुजन आघाडी नाराज झाली असून चर्चेचे भिजत असलेले घोंगडे आणखी काही काळ चालणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आमची चर्चा पूर्ण सकारात्मक झाल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, पहिल्या बैठकीपासून आजच्या बैठकीपर्यंत जागांच्या संदर्भात कोणतीही चर्चा मविआने केली नाही. आम्ही सादर केलेला प्रस्ताव आणि जागांच्या संदर्भात मविआने वेळ मागून घेतला आहे. त्यामुळे पुढील बैठकीत काही गोष्टी स्पष्ट होण्याची शक्यता असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी दिली.

मी आघाडीसोबत आहे, पण मला असं वाटतं आघाडीच माझ्यासोबत नाही, असे प्रकाश आंबेडकर बैठकीत म्हणाल्याचेही मोकळे यांनी स्पष्ट केले. वंचितच्या या दाव्यामुळे आघाडीच्या जागावाटप चर्चेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अकोल्याची जागा सोडण्याची वंचितची तयारी

मी आघाडीसोबत आहे, पण मला असं वाटतं आघाडीच माझ्यासोबत नाही. ही आघाडी व्हावी आणि ती शेवटपर्यंत टिकून राहावी आणि भाजपचा पराभव या आघाडीने करावा. हवं असेल तर माझी अकोल्याची जागा द्यायला मी तयार आहे. मात्र, तुम्ही काही बोला आणि तोडगा काढा आपण पुढे जाऊ, असेही प्रकाश आंबेडकर यांनी बैठकीत सांगितल्याचे सिद्धार्थ मोकळे यांनी नमूद केले.

या बैठकीत आतापर्यंत ज्या मुद्यांवर चर्चा होऊ शकली नाही, ते मुद्दे पुढे आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकली नाही. मनोज जरांगेंच्या आंदोलनाविषयी मविआची भूमिका काय आहे, याची देखील चर्चा झाली नसल्याचे मोकळे यांनी म्हटले आहे. सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटले आहे की, मागील वेळी आम्ही मविआला प्रस्ताव दिला त्यात एक महत्वाचा अजेंडा होता. तो म्हणजे ओबीसी समाजाला लोकसभेत ४८ पैकी १५ जागा दिल्या पाहिजेत. पण, यावर चर्चा होऊ शकली नाही. तीन उमेदवार अल्पसंख्याक समाजातील असावेत, असा प्रस्ताव वंचितने दिला होता. यावरही चर्चा झाली नाही. भाजपला पराभूत करण्यासाठी मविआ एकत्र येऊन लढत आहे. भाजपच्या हुकूमशाही विरोधात लढत आहे. त्यामुळे मविआचा भाग असलेला पक्ष भाजपसोबत निवडणुकीच्याआधी किंवा निवडणुकीनंतर कोणत्याही प्रकारे समझोता, युती आघाडी करणार नाही, असे लेखी वचन घटक पक्षांनी द्यावे, असाही प्रस्ताव दिला होता. मात्र, त्यावरही चर्चा होऊ शकली नाही. पहिल्या बैठकीपासून वंचितचे प्रतिनिधी मविआला विचारत आहेत. तुम्ही आम्हाला काय देणार, कुठल्या जागा देणार, ते आम्हाला सांगा. त्यावर आम्हाला चर्चा करता येईल. मात्र, अद्यापही जागेच्यासंदर्भात कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. त्यामुळे मविआने आम्ही दिलेले प्रस्ताव आणि जागेच्या संदर्भात वेळ मागून घेतली आहे. पुढच्या आठवड्यात बसून चर्चा करु, असे मविआच्यावतीने सांगण्यात आले असून, काहीतरी चांगलेच होईल, अशी आशा आम्हाला आहे, असे मोकळे यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in