महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फाॅर्म्युला ठरला!‘वंचित’ला सामावून घेण्यासाठी तडजोडीचा आग्रह

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपली युती उद्धव ठाकरे यांच्याशी असल्याने २४-२४ चा फॉर्म्युला पुढे रेटला होता
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फाॅर्म्युला ठरला!‘वंचित’ला सामावून घेण्यासाठी तडजोडीचा आग्रह

राजा माने/मुंबई: इंडिया आघाडीचा लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला ठरला आहे. आता केवळ त्याच्यावर शिक्कामोर्तब होणे बाकी असल्याचे आघाडीतील नेत्यांनीच स्पष्ट केले आहे. खा. सुप्रिया सुळेंनीही तसा सूर लावला आहे. प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीला सामावून घेण्यासाठी आघाडीतील सर्वच पक्षांनी दोन पावले मागे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तथापि, अंतिम निर्णय दिल्लीतूनच होईल, असे सूत्रांनी सांगितले.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपली युती उद्धव ठाकरे यांच्याशी असल्याने २४-२४ चा फॉर्म्युला पुढे रेटला होता. एकीकडे भाजप महायुतीत जागावाटपावरून मतभेद असल्याचे चित्र समोर येत असतानाच महाविकास आघाडीतही चांगलीच धुसफूस सुरू झाली होती. ठाकरे गटाने २३ जागांचा दावा केला. काँग्रेसने हा दावा फेटाळून लावला. परंतु, ठाकरे गट २३ जागांवर ठाम आहे. त्यामुळे आता नवा तिढा निर्माण झाला आहे. त्यातच याच मुद्यावरून काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी ठाकरे गटावर टीकास्त्र सोडले. त्यामुळे खा. संजय राऊत आक्रमक झाले असून, त्यांनीही संजय निरुपम यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे महाविकास आघाडीत धुसफूस सुरू झाली. दरम्यान, वंचित आघाडीनेही १२ जागा मागितल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आता यावर ज्येष्ठ नेते शरद पवार काय मार्ग काढणार, हे लवकरच स्पष्ट होईल.

मुंबईतून सहा लोकसभा जागांपैकी दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई या तीन जागा शिवसेना ठाकरे गट लढणार असून उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर मुंबई या दोन जागा काँग्रेस लढणार असून उत्तर पूर्व मुंबईची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोडण्यात आली आहे. तर रायगड, संभाजी नगर या दोन जागा उबाठाला सोडण्यात आल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या १३ जागांपैकी उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, भिवंडी, पुणे, सोलापूर, लातूर, नांदेड, धुळे, नंदुरबार, नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, तर वंचितसाठी अकोला, शिर्डी आणि राजू शेट्टी यांना कोल्हापूर, हातकणंगले, तर बहुजन विकास आघाडी सामील झाल्यास त्यांना पालघरची जागा सोडण्यात येईल, यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भाजपला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीची एकजूट वाढविण्याच्या दृष्टीने तिन्ही पक्षांकडून प्रयत्न सुरू असताना आता जागावाटपावरून तिढा वाढण्याची चिन्हे आहेत. या वादाला शिवसेना ठाकरे गटानेच तोंड फोडले आहे. खरे म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जागा जिंकण्याच्या निकषावर जागावाटप करण्याचे सूत्र स्वीकारण्याचा मानस बोलून दाखवला होता. त्यावर सर्वच मित्रपक्ष तयार झाले होते. मात्र, आता जागावाटपाच्या हालचाली सुरू होताच शिवसेना ठाकरे गटाने २३ जागांवर दावा केला. आम्ही ज्या जागा लढविल्या, त्या सोडणार नाही, असे त्यांनी म्हटले. याबाबत बोलताना खा. संजय राऊत यांनी शिवसेनेचे विद्यमान खासदार असलेल्या १८ जागा वगळून इतर जागांवर चर्चा करावी लागेल. आज काही जण शिंदे गटात गेलेले असले तरी १८ जागांवर आमचाच दावा असेल. याशिवाय ५ जागा मिळाल्या पाहिजेत. असे सांगून कोणत्या जागांवर लढायचे, याची माहितीही त्यांनी दिली.

शिवसेनेचा सर्वाधिक वाटा

दिल्लीत झालेल्या आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत ठरलेल्या फार्म्युल्यानुसार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला १८ ते १९ जागा, काँग्रेसला १३, राष्ट्रवादी काँग्रेसला १०, वंचित आघाडी २, स्वाभिमानी शेतकरी संघटना २, तर बहुजन विकास आघाडीला १ जागा देण्यावर एकमत झाले आहे. मात्र, अजून चार जागांवर असलेली चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच अंतिम जागावाटप जाहीर करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मेरिटनुसार जागावाटप -पटोले

जागावाटपावरून महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, मेरिटनुसारच जागावाटप होणार असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेतूनही भूमिका स्पष्ट केलेली आहे. भाजपचा पराभव करणे हेच काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लक्ष्य आहे. भाजपविरोधात लढणाऱ्या सर्वांना बरोबर घेऊन ही लढाई लढू ही काँग्रेसची भूमिका आहे. असे स्पष्ट करत उलट महायुतीतच जागावाटपावरून तीव्र मतभेद आहेत, त्यांच्यात भयानक तणाव आहे, परंतु भाजप शेवटी ईडी, सीबीआयचा वापर करून त्यांना शांत करेल, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in