परदेशी पर्यटकांसाठी महाअतिथी पोर्टल; घरबसल्या बुकिंग, पर्यटनस्थळी सोयीसुविधा; पर्यटन विभागाचा पुढाकार

महाराष्ट्रात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी एकाच क्लिकवर सर्व माहिती मिळावी, यासाठी राज्य पर्यटन विभागाने ‘महाअतिथी’ हे विशेष पोर्टल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या पोर्टलवर घरबसल्या बुकिंगसह पर्यटनस्थळांवरील सोयीसुविधांची माहिती उपलब्ध होणार आहे. लवकरच हे पोर्टल कार्यान्वित होईल, अशी माहिती पर्यटन संचालक भगवंतराव पाटील यांनी दिली आहे.
परदेशी पर्यटकांसाठी महाअतिथी पोर्टल; घरबसल्या बुकिंग, पर्यटनस्थळी सोयीसुविधा; पर्यटन विभागाचा पुढाकार
Published on

मुंबई : महाराष्ट्रात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांना एकाच क्लिकवर सर्व आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यासाठी राज्य पर्यटन विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पर्यटनस्थळी घरबसल्या बुकिंग, पर्यटनस्थळी काय सोयीसुविधा उपलब्ध याची माहिती देशी विदेशी पर्यटकांना मिळणार आहे. 'महाअतिथी' नावाचे विशेष पोर्टल लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती राज्य पर्यटन विभागाचे संचालक भगवंतराव पाटील यांनी दिली. दरम्यान, पर्यटन विभागाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्याला दरवर्षी सुमारे १५ ते २० लाख आंतरराष्ट्रीय पर्यटक भेट देतात. या पोर्टलमुळे हॉटेल, पर्यटन स्थळे (टुरिस्ट स्पॉट्स), कृषी पर्यटन (ऍग्रो टुरिझम), स्थानिक खाद्यपदार्थ (लोकल फूड), होम स्टे यासारख्या सर्व आवश्यक सुविधांची माहिती आंतरराष्ट्रीय पर्यटकांना एकाच ठिकाणी मिळणार आहे. मुंबई, लोणावळा, महाबळेश्वर, तोरणमाळ येथे आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा मोठा ओढा असतो. सध्या आंतरराष्ट्रीय पर्यटक सरासरी दीड दिवस मुक्काम करतात आणि त्यांचा दररोजचा खर्च सुमारे १० हजार रुपये असतो तर स्थानिक पर्यटक सरासरी सव्वा दिवस मुक्काम करतात व त्यांचा खर्च ६ हजार रुपये असतो. परदेशी पर्यटकांचा मुक्काम कालावधी वाढवून राज्याच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नातील (जीडीपी) पर्यटनाचा सध्याचा ७ टक्के वाटा १५ टक्के पर्यंत नेण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट विभागाने ठेवले असल्याचे पाटील यांनी सांगितले.

मुंबईसह राज्यभरात अनेक धार्मिक तसेच पुरातन वारसा असलेली पर्यटन स्थळे असल्यामुळे राज्यात येत्या काळात मोठ्या प्रमाणात पर्यटनवाढीसाठीच्या संधी विकसित होणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून त्या दृष्टीनेही अधिक हालचाली सुरू झाल्या आहेत.

पर्यटकांना कृषी पर्यटनाचे आकर्षण

कृषी पर्यटन धोरणाला चांगला प्रतिसाद मिळाल्याने सध्या २ हजार 'ऍग्रो टुरिझम' केंद्रे नोंदणीकृत झाली आहेत. आंतरराष्ट्रीय पर्यटक कृषी पर्यटनाकडे आकर्षित होत आहेत, जिथे त्यांना पिके, फळे, लोककला, ग्रामीण खेळ, बैलगाडी सफर आणि फार्म स्टे/होम स्टे सुविधांचा अनुभव घेता येतो. द्राक्ष कापणीसाठी जपानचे २० ते २५ गट राज्याला भेट देत असतात, असेही ते म्हणाले.

पर्यटकांचा ओघ वाढेल

कृषी पर्यटनामुळे शेतकऱ्यांना शेतीला पूरक असा व्यवसाय उपलब्ध होऊन ग्रामीण भागात महिला व तरुणांसाठी रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. 'महाअतिथी' पोर्टलमुळे पर्यटकांचा ओघ वाढण्यास मदत होईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in