

पाचगणी : महाबळेश्वर-पाचगणी पर्यटन पट्ट्यातील खिंगर गावाजवळील ‘वर्षा व्हिला’ बंगल्यावर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून सुरू असलेले अश्लील नृत्य उघडकीस आणले. या कारवाईत पोलिसांनी बंगला मालकासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून सुमारे १८ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पाचगणी पोलिसांना बंगल्यात ‘गायिका’ व ‘महिला वेटर’ म्हणून आणलेल्या बारबाला संगीताच्या तालावर उत्तान कपड्यांमध्ये नाचवले जात असल्याची माहिती मिळाली होती. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय अधिकारी सुनिल साळुंखे यांच्या निर्देशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी सोमवारी मध्यरात्री एक वाजता छापा टाकला.
छाप्यावेळी बंगल्यात सहा बारबाला सुमारे पाच ते सात गिऱ्हाईकांसमोर अश्लील हावभाव करत नृत्य करताना पोलिसांना दिसल्या. ग्राहक आणि बारबाला परस्पर लगट करत असल्याचेही दिसून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून पाच जणांना अटक केली, तर बंगला मालकासह एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.