
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. फ्रान्स येथील रंजिस आंतरराष्ट्रीय बाजार, तसेच नेदरलँडमधील रॉयल फ्लोरा येथील बाजाराच्या धर्तीवर राज्य सरकार राज्यात शेतकऱ्यांसाठी ‘महाबाजार’ स्थापन करणार आहे.
कृषी क्षेत्राचा विकास झपाट्याने होत असून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी राज्यात ‘महाबाजार’ स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला असून या अभ्यास दौऱ्यादरम्यान रंजिस आंतरराष्ट्रीय बाजार (पॅरिस) आणि रॉयल फ्लोरा हॉलंड (नेदरलँड्स) या जागतिक दर्जाच्या बाजार व्यवस्थापन पद्धतींचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. तसेच भारतीय दुतावासांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी चर्चा करून जागतिक पातळीवरील सर्वोत्तम पद्धती व धोरणात्मक निर्णय प्रक्रियेचा अनुभव घेण्यात येणार आहे.
राज्यातील कृषी व फुलांचा लिलाव बाजार जागतिक पातळीवर विकसित करून महाराष्ट्रातील कृषी उत्पादनांना जागतिक ब्रँडिंग व निर्यात प्रोत्साहन देणे हा दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे.
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळून त्यांची उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या अभ्यास दौऱ्याची आखणी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांच्यामार्फत केली जाणार आहे. या दौऱ्यातील प्रवास व भेटींचे वेळापत्रक अंतिम करण्यात आले असून, युरोपातील आधुनिक बाजार व्यवस्थापनाच्या मॉडेलचा अनुभव घेत राज्यात जागतिक दर्जाचे ‘महाबाजार’ स्थापन करण्याची प्रक्रिया यामुळे गतिमान होणार आहे. याबाबत सोमवारी शासन निर्णय जारी करण्यात आला.
कृषिमंत्री रावल जाणार अभ्यास दौऱ्यावर
या बाजारांचा अभ्यास करण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री जयकुमार रावल व राज्य कृषी पणन मंडळाचे संचालक चंद्रसिंग ठाकूर ११ ते २१ जूनदरम्यान फ्रान्स, नेदरलँड, हॉलंड दौऱ्यावर जाणार आहेत.