
आज रायगडमधील महाड एमआयडीसीमध्ये (Mahad Fire) एका कंपनीला भीषण आग लागली. अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसीतील मल्लक स्पेशालिटी या कंपनीमधील इथेनॉल ऑक्साईड प्लांटला ही आग लागली. आगीची माहिती काळातच अग्निशमन दलाच्या १०हुन अधिक गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात इथेनॉल ऑक्साईडचे साठे आहेत. यामधील एका टाकीतील साठा जाळून खाक झाला असून दुसऱ्या टाकीचा स्फोट होऊन ही आग आणखीन पसरली. या स्फोटाचे हादरे अगदी १० किलोमीटर अंतरावर जाणवत होते. तसेच, छोटे छोटे स्फोट होत असल्याने बराचवेळ आगीवर नियंत्रण मिळवण्यास अडचणी येत होत्या. यामध्ये तब्बल ११ जण जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. जखमींवर नजीकच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली की आजूबाजूचा परिसर निर्मनुष्य करण्यात आला.