
मुंबई : बीड जिल्ह्यामधील परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासासाठी आता ‘एसआयटी’ स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘डीजीपीं’ना दिले आहेत. या प्रकरणात कोणी असले तरी त्याला सोडणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितले. महादेव मुंडे यांच्या हत्येला २१ महिने झाले तरी तपास संथगतीने सुरू असून परळीतील बंगल्यावरून फोन आला तो कोणाचा याची ‘सीडीआर’ चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
परळीच्या तहसीलदार परिसरात २१ ऑक्टोबर २०२३ रोजी महादेव मुंडे यांची हत्या झाली. महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड व त्याचा मुलगा सहभागी असल्याचा आरोप केला जात आहे. महादेव मुंडे यांच्या हत्येला दोन वर्षांचा कालावधी होत आला तरी कोणाला अटक करण्यात आलेली नाही. महादेव मुंडे यांची हत्या २१ ऑक्टोबर २०२३ रोजी परळीतील तहसीलदार परिसरात झाली असून तेव्हापासूनचा सगळा तपशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितले. महादेव मुंडे हत्या प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करत याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. महादेव मुंडे यांच्या हत्येत सहभागी असलेल्या कुणालाही सोडणार नाही, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितले.
सुरेश धस यांचा अजित पवारांना टोला
परळीतील महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात बीड जिल्ह्यातील पोलिसांनी हलगर्जीपणा केला आहे. बीड जिल्ह्यात नेमके काय सुरू आहे याची माहिती घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची ८ ते १० माणसे पाठवावीत, मग कळेल की परळीत नेमके काय सुरू आहे, असा टोला भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अजित पवार यांना लगावला.