
कोल्हापूर : नांदणी मठाची ‘माधुरी’ उर्फ ‘महादेवी’ हत्तीण पुन्हा कोल्हापुरात परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रश्नावर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वधर्मीय नागरिकांनी दाखवलेल्या एकजुटीची वज्रमूठ अखेर यशस्वी ठरली आहे, अशा भावना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केल्या आहेत.
नांदणी (ता. शिरोळ) येथील मठातील ‘महादेवी’ हत्तीणीला ‘वनतारा’ या संस्थेकडून पुनर्वसनासाठी नेण्यात आले होते. यावरून कोल्हापूर जिल्ह्यात तीव्र नाराजी आणि रोषाचे वातावरण निर्माण झाले होते.
महादेवी हत्तीण ही केवळ एक प्राणी नसून, ती कोल्हापूरकरांची श्रद्धा आणि अस्मितेचा विषय बनली होती. मंत्री हसन
मुश्रीफ यांनी एका ट्वीटद्वारे या यशस्वी लढ्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, बुधवारी सकाळीच ‘वनतारा’च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर या पथकाने थेट नांदणी मठ गाठून मठाचे महास्वामीजी आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या बैठकीत ‘वनतारा’च्या अधिकाऱ्यांनी महादेवी हत्तीणीला लवकरच कोल्हापुरात परत आणण्याचे आणि नांदणी मठाच्या परिसरातच ‘वनतारा’चे एक नवीन पुनर्वसन केंद्र उभारण्याचे आश्वासन दिले.
कोल्हापूरचा स्वाभिमान पेटून उठला
कोल्हापूर जिल्हा जर स्वाभिमानाने पेटून उठला तर काय घडू शकते, याचीच ही प्रचिती आहे, असे म्हणत मुश्रीफ यांनी या लढ्यात सहभागी झालेल्या तमाम कोल्हापूरवासियांचे अभिनंदन केले. ही लढाई सर्वधर्मीय जनतेने एकजुटीने लढल्यामुळेच हे यश मिळाले असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘वनतारा’ला मुश्रीफ यांची सूचना
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ‘वनतारा’ संस्थेबद्दल जो रोष निर्माण झाला होता, तो कमी करण्यासाठी मुश्रीफ यांनी एक महत्त्वाची सूचना केली आहे. ‘नांदणी मठात पुनर्वसन केंद्र करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहेच, पण लोकांच्या मनातील कटुता पूर्णपणे नाहीशी करायची असेल, तर 'वनतारा'ने आळते येथील जंगल घेऊन 'वनतारा फेज-२' उभारावे. यासाठी आम्ही सर्वतोपरी पाठपुरावा करू,’ असेही त्यांनी सुचवले. या यशस्वी तोडग्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ‘वनतारा’चे मालक आणि अधिकारी यांचे, तसेच तमाम कोल्हापूर जिल्हावासीयांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.