
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील जैन मठातील महादेवी हत्तीण पुन्हा तेथील मठात आणण्यासाठी केंद्र सरकारकडून सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी गुरुवारी नवी दिल्लीत केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले. जनभावनेचा सन्मान राखत कायदेशीर बाजूंनुसार सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही यावेळी केंद्रीय वनमंत्र्यांनी दिली.
महाडिक यांनी आपल्या निवेदनात सांगितले की, स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठात अनेक वर्षे असलेली महादेवी हत्तीण स्थानिक नागरिकांच्या भावना आणि श्रद्धेचा विषय आहे. मात्र प्राणीप्रेमी संघटनांच्या तक्रारींनंतर न्यायालयाच्या आदेशानुसार तिला गुजरातमधील वनतारामध्ये स्थलांतरित करण्यात आले. यानंतर नांदणी गावासह शिरोळ तालुक्यात तीव्र जनक्षोभ निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांत नागरिकांनी आंदोलनाद्वारे नाराजी व्यक्त केली.
महाडिक यांनी याबाबतची सर्व पार्श्वभूमी वनमंत्र्यांसमोर मांडली. त्यांनी सांगितले की, मठात हत्तीणीच्या संगोपनासाठी योग्य व्यवस्था असून तिच्या आरोग्य आणि सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाईल. यामुळे ती पुन्हा नांदणी मठात आणावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.