

कोल्हापूर : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या वार्षिक किरणोत्सवाला ९ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत असून तो ११ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्याआधी ८ नोव्हेंबर रोजी सूर्यकिरणांची पडताळणी करण्यात आली. सायंकाळी ५.४२ वाजता मावळत्या सूर्यकिरणांनी महाद्वारातून प्रवेश करून देवीच्या चरणांना स्पर्श केला. त्यानंतर हे किरण देवीच्या खांद्यापर्यंत पुढे गेले आणि काही क्षणांत लुप्त झाले.
शनिवार सुट्टीचा दिवस असल्याने ८ नोव्हेंबरला मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून हा अद्वितीय दृश्य सोहळा पाहिला. सूर्यकिरण मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी गाभाऱ्यातील दिवे मालवून केवळ दोन समया तेवत ठेवण्याची प्रथा पाळली जाते. किरणोत्सवानंतर देवीची कर्पूरआरती आणि देवळातील घंटानादाने सोहळ्याची सांगता होते. ८ नोव्हेंबर रोजी तब्बल ८ लाख ५१ सहस्र भाविकांनी देवीचे दर्शन घेतले.
वर्षातून दोनदा किरणोत्सव
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरातील किरणोत्सव वर्षातून दोनदा उत्तरायण आणि दक्षिणायन या दोन कालखंडांत साजरा केला जातो. उत्तरायण ३१ जानेवारी, १ व २ फेब्रुवारी रोजी तर दक्षिणायन ९, १० व ११ नोव्हेंबर रोजी असणार आहे. या दिवसांत मावळत्या सूर्यकिरणांचा प्रवास महाद्वारातून सुरू होऊन प्रथम दिवशी देवीच्या चरणांना, दुसऱ्या दिवशी पोटाला आणि तिसऱ्या दिवशी मुखासह संपूर्ण मूर्तीला स्पर्श करतो.
कोट्या किरणोत्सवाचा आम्ही सध्या ७दिवसांचा अभ्यास करत आहोत. ७ नोव्हेंबरला ढगाळ वातावरण असल्याने किरणोत्सव दिसला नाही; मात्र ८ नोव्हेंबरला वातावरण स्वच्छ असल्याने सूर्यकिरणे स्पष्टपणे जाणवली. हा अभ्यास आता १४ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील.
शिवराज नाईकवाडे, -सचिव देवस्थान समिती