महालक्ष्मी रेसकोर्सवर होणार सेंट्रल पार्क; आचारसंहिता लागू होण्याआधीच उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून घोषणांचा पाऊस

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी घोषणांचा पाऊस पाडला.‌ मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवर ‘सेंट्रल पार्क’, तर ठाण्यात देशातील सर्वांत उंच ‘व्हिव्हिंग टॉवर’ उभारण्याची घोषणा शिंदे यांनी केली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी घोषणांचा पाऊस पाडला.‌ मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवर ‘सेंट्रल पार्क’, तर ठाण्यात देशातील सर्वांत उंच ‘व्हिव्हिंग टॉवर’ उभारण्याची घोषणा शिंदे यांनी केली.

रेसकोर्सवर ‘थीम पार्क’ उभारण्याची शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संकल्पना होती. मात्र, शिंदे यांनी ‘सेंट्रल पार्क’ची घोषणा करत ठाकरे गटाच्या संकल्पनेला छेद दिला आहे. ठाण्यातदेखील देशातील सर्वांत उंच ‘व्हिव्हिंग टॉवर’ उभारण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा आराखडा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सादर करण्यात आला. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि आर्किटेक्ट हाफिज कॉन्ट्रॅक्टर यावेळी उपस्थित होते.

मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना ठाकरे गटाने महालक्ष्मी येथील रेसकोर्सवर ‘थीम पार्क’ उभारण्याची घोषणा अनेकदा वचननाम्यातून केली. मात्र, ‘थीम पार्क’ला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. तसेच हे प्रकरण न्यायालयात गेले असता न्यायालयाने या प्रकल्पाला स्थगिती दिली. रेसकोर्सवरील ‘थीम पार्क’वरून राजकीय वातावरण त्यावेळी चांगलेच तापले होते. आता तब्बल चार वर्षांच्या विलंबानंतर होणाऱ्या महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा रेसकोर्सवरील पार्कचा मुद्दा रंगणार आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पालिका निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी ‘नंदनवन’ येथे पत्रकार परिषद घेऊन ‘थीम पार्क’ऐवजी ‘सेंट्रल पार्क’ उभारणार असल्याची घोषणा केली. रेसकोर्सवरील १२५ एकर आणि कोस्टल रोडवरील १७० एकर अशी मिळून एकूण २९५ एकर जागा या प्रकल्पासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. तसेच पार्कखाली १० लाख चौरस फूट जागेवर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार असून येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तसेच पारंपरिक मराठी खेळ, खो-खो, कबड्डी आदींसाठी सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे ते म्हणाले.

प्रदूषण कमी करणारे ‘ऑक्सिजन पार्क’

मुंबईत सुमारे ३०० एकरांचे ‘ऑक्सिजन पार्क’ तयार होईल. त्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. संपूर्ण उद्यान पूर्णपणे हरित असेल. कोणतेही काँक्रीट बांधकाम होणार नाही. शिवाय रेसकोर्सचा वारसा जपला जाईल. ‘सेंट्रल पार्क’ भूमिगत मार्गाने कोस्टल रोडशी जोडले जाणार असल्याने या पार्कच्या कनेक्टिव्हिटीसाठी १२०० मीटर भूमिगत मार्ग तयार केला जाणार आहे. त्यासाठी ५५० कोटींचे टेंडर काढण्यात आले आहे. मे २०२५ पर्यंत सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण होईल, तसेच ६ डिसेंबर २०२६ पर्यंत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण करण्यात येतील, असा दावा शिंदे यांनी केला.

मेट्रो आणि कोस्टल रोडशी ‘सेंट्रल पार्क’जोडणार

‘सेंट्रल पार्क’ मेट्रो-३ मार्गावरील नेहरू सायन्स सेंटर स्टेशनला भूमिगत मार्गाने जोडले जाईल. हा मार्ग हाजी अलीपर्यंत जाऊन पार्किंग आणि कोस्टल रोडशी जोडला जाणार आहे. कोस्टल रोड पार्किंगमध्ये १२०० गाड्या आणि १०० बसेस थांबविण्याची सुविधा असेल, असे मुंबई महापालिका प्रशासक तथा आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले.

असे असणार सेंट्रल पार्क

  • १२ एकर ‘सिटी फॉरेस्ट’मध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी हरित क्षेत्र

  • ७७ एकरांवर ‘ओपन कॉन्सर्ट’ आणि ‘गार्डन झोन’

  • ३१ एकरांवर बॉटनिकल गार्डन, कॉन्फरन्स आणि इनडोअर अरेना

  • ‘मल्टी-स्पोर्ट अरेना’मध्ये जलतरण, बॉक्सिंग, खो-खो, बास्केटबॉल, जिम्नॅस्टिकसाठी आधुनिक सुविधा

logo
marathi.freepressjournal.in