
मुंबई : गतवर्षी इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षा आणि संकलित मूल्यमापन चाचणीचे वेळापत्रक आयत्या वेळी बदलल्यामुळे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेला (एससीईआरटी) टीकेचे धनी व्हावे लागले होते. यातून धडा घेत एससीईआरटीने यंदा सावध पवित्रा घेत इयत्ता पहिली ते दहावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दहावीची परीक्षा फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात, तर इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षा गत वर्षीप्रमाणे एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात घेण्यात येणार आहेत.
यापूर्वी पहिली ते नववी परीक्षा आयोजित करण्याचे अधिकार प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापकांना होते. त्यामुळे वार्षिक परीक्षेचे नियोजनही मुख्याध्यापक शाळांच्या वेळापत्रकानुसार करत होते. यामुळे शैक्षणिक दिवस वाया जात असल्याचे कारण देत एससीईआरटीने गेल्या वर्षी राज्यातील सर्व शाळांच्या वार्षिक परीक्षा तसेच संकलित मूल्यमापन चाचणी म्हणजेच पॅटचे वेळापत्रक जाहीर केले. या निर्णयावर पालक, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षणसंस्था या सर्व पातळ्यांवर टीका होऊनही एससीईआरटीने आपला निर्णय पुढे रेटला.
शिक्षकांची कसरत
राज्यभरातील शाळांमधील इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षा आणि पॅट चाचणी एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच घेण्याचेही या वेळापत्रकानुसार निश्चित करण्यात आले आहे. परिणामी गेल्या शैक्षणिक वर्षात घिसडघाईने घेतलेला परीक्षांबाबतचा निर्णय यंदा शाळांना वेळेतच कळवण्यात आला आहे. त्यामुळे यंदा शैक्षणिक वर्षातील प्रत्यक्ष अध्ययनाचे दिवस एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सुरू राहणार असून शिक्षकांना यंदाही तातडीने उत्तरपत्रिका तपासून निकाल जाहीर करावा लागणार आहे.