निकृष्ट बांधकामाचा शिवरायांनाही फटका! राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळला; ८ महिन्यांपूर्वीच मोदींनी केले होते उद्घाटन

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालाही भ्रष्टाचाऱ्यांच्या निकृष्ट बांधकामामुळे उन्मळून पडावे लागल्याने समस्त शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
निकृष्ट बांधकामाचा शिवरायांनाही फटका! राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळला; ८ महिन्यांपूर्वीच मोदींनी केले होते उद्घाटन
x
Published on

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारण्यात आलेला भव्य पूर्णाकृती पुतळा सोमवारी दुपारी कोसळला अन‌् संपूर्ण महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालाही भ्रष्टाचाऱ्यांच्या निकृष्ट बांधकामामुळे उन्मळून पडावे लागल्याने समस्त शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ आठ महिन्यांपूर्वी डिसेंबर महिन्यात अगदी वाजतगाजत या पुतळ्याचे लोकार्पण केले होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अद्वितीय शौर्याला सलाम करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. ४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका शानदार कार्यक्रमात या पुतळ्याचे अनावरण केले होते. हा पुतळा एकूण ४३ फूट उंच होता. यामध्ये जमिनीपासून १५ फुटाचा चबुतरा व त्यावर २८ फूट उंचीचा महाराजांचा पुतळा उभा होता. हा भव्य पुतळा सोमवारी दुपारी अचानक कोसळला. हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली असून, केंद्र व राज्य सरकारवर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठवली जात आहे.

हा पुतळा शिवप्रेमींसाठी आकर्षण ठरला होता. गेले दोन-तीन दिवस किनारपट्टी भागात वादळी वारे व मुसळधार पाऊस सुरू आहे. यातच सोमवारी दुपारी वादळी वाऱ्यामुळे राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पायातून तुटून खाली कोसळला. स्थानिकांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी याची माहिती प्रशासनास दिली.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक शिवप्रेमींनी राजकोट येथे धाव घेतली. तहसीलदार वर्षा झालटे, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे हेही पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी संतप्त झाले होते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली. तसेच पुतळ्याच्या ठिकाणी कोणालाही जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे कोणत्याही घटनेनंतर तत्काळ प्रतिक्रिया देणाऱ्या महायुतीतील नेत्यांनी पुतळा कोसळल्यानंतर काही काळ मौन धारण पसंत केले. त्यामुळे शिवप्रेमींच्या संतापात अधिकच भर पडली आहे.

दोषींवर कारवाई करा - वैभव नाईक

ही दुःखद घटना असून, एक शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो. काही महिन्यांपूर्वीच कोट्यवधी रुपये खर्च करून हा पुतळा उभारण्यात आला होता. त्यावेळी स्थानिकांनी बांधकामावर काही हरकती घेतल्या होत्या. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. ४०० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या किल्ल्याचा आजपर्यंत एक दगडही हलला नाही, मात्र ८ महिन्यांतच पुतळा कोसळला. शिवाजी महाराज यांचा पुतळा निकृष्ट बांधकामामुळे कोसळला असून, याप्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करून कारवाई करा, अन्यथा राज्यभर आंदोलन केले जाईल, असा इशारा कुडाळचे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.

घाईगडबडीत उभारल्याने पुतळा कोसळला - संभाजीराजे

पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी घाई-गडबडीत पुतळा उभारण्यात आल्याने तो कोसळल. मुळातच आकारहीन व शिल्पशास्त्रास अनुसरून नसलेला व घाईगडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच आम्ही पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केली होती. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वर्षभरात कोसळते, यासारखी दुर्दैवी बाब दुसरी कोणतीही नाही. अशा परिस्थितीत महाराजांच्या किल्ल्यांवर आपण कोणत्या अधिकाराने बोलणार! आता त्याठिकाणी पुन:श्च महाराजांचे उचित स्मारक उभारणे गरजेचेच आहे. पण निवडणुकीच्या आधी ते उभारण्याच्या इर्ष्येत परत काही गडबड करू नये. उशीर होऊ दे, पण शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बांधणी झाली पाहिजे.

मोदींना दोष देऊन काय उपयोग? - जरांगे-पाटील

स्मारकाचे काम करणारा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? कोणीतरी नेताच असणार, कशातही पैसै खायची सवय लागली यांना, सगळ्यांना जेलमध्ये टाका, सोडू नका. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करतात. यांना कशात खावं, हेसुद्धा कळत नाही. यांना पुतळे कळत नाही, दैवत कळत नाही, छत्रपती शिवराय देशाचे दैवत, ते हिंदू धर्माची अस्मिता आहेत. कोण कॉन्ट्रॅक्टर, कोणी उद्घाटन केले, मोदीसाहेबांनी उद्घाटन केले म्हणतात. ते इतक्या अडचणीत कुठे गेलते, इतक्या लांब. आता त्यांना दोष देऊन उपयोग नाही. काम करणारेच नीट नसले तर ते काय करणार. परंतु हे असले लोक ज्यांना छत्रपती शिवरायांचा पुतळा कळत नाही, त्यांना सोडलेच नाही पाहिजे. यांना एकदाच अद्दल घडायला पाहिजे.

आम्ही तेव्हाच आक्षेप घेतला होता - इंद्रजित सावंत

सिंधुदुर्गशेजारी असणाऱ्या राजकोट या जलदुर्गावर भारतीय नौदलामार्फत बसवला गेलेला आणि भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेला पुतळा हा एक वर्षभराच्या आतच धराशयी झालेला आहे. हा पुतळा बसवला त्याचवेळी माझ्यासारख्या अभ्यासकाने या पुतळ्याच्या सौष्ठवाबद्दल आणि त्याच्या मजबुतीबद्दल आक्षेप घेतला होता. हा पुतळा शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारत नाही. याबद्दलही त्यावेळेला आम्ही पोस्ट लिहून लोकांसमोर आलो होतो. पण याकडे संबधितांनी दुर्लक्ष केले होते. त्यानंतर ३-४ फेब्रुवारी २०२४ ला मी या पुतळ्याला भेट दिली होती आणि त्यावेळीही हा पुतळा जास्त काळ टिकणार नाही. हे शिल्प बदलावे, असे निरीक्षण नोंदवले होते. खरेतर नौदलासारख्या प्रख्यात आस्थापनेने केलेले काम हे चिरंतन व्हायला पाहिजे; इतके ते मजबूत आणि सुंदर असायला हवे होते.

पुतळा व संकुलासाठी केली होती ५ कोटींची तरतूद

छत्रपती शिवाजी महाराज यांना देशातील पहिल्या आरमाराचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यांच्या सन्मानार्थ भारतीय नौदलानेही आपल्या ध्वजावर शिवरायांची राजमुद्रा छापली आहे. राजकोट येथील शिवपुतळा संकुलाचे सुशोभीकरण व इतर व्यवस्थापनासाठी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली यांच्या कार्यालयाने तब्बल ५ कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यानंतर राज्य सरकार व नौदलाच्या परवानगीनंतर या पुतळ्याचे बांधकाम सुरू झाले होते. पण आता हा पुतळा पडल्यामुळे एकूणच महान विभूतींच्या सन्मानार्थ उभारण्यात येणाऱ्या स्मारकांच्या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे आणि त्यांचा पुतळा ही आमची अस्मिता आहे. तो पुतळा भारतीय नौदलाने उभारला होता. पुतळ्याचे डिझाईन नौदलानेच तयार केले होते. हा पुतळा कोसळल्याचे वृत्त समजल्यावर मी तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी मला सांगितले की, ही घटना घडली त्यावेळेला त्या भागात ४५ किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने सोसाट्याचा वारा वाहत होता, त्यामुळे पुतळ्याचे नुकसान झाले. मंगळवारी घटनास्थळी नौदलाचे अधिकारी जाणार आहेत. नौदलाचे अधिकारी व आमचे अधिकारी स्मारकाची पाहणी करतील. लगेचच छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पुन्हा उभारणीच्या कामाला सुरुवात केली जाईल. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी आपल्या महाराजांचा पूर्णाकृती पुतळा दिमाखात आणि मजबुतीने उभा राहिलेला तुम्हाला दिसेल.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
हा पुतळा नौदलाने उभारला असून त्याच्या देखभालीचे कामही त्यांच्याकडे होते. याप्रकरणी आम्ही मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दोषींवर कडक कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भात केलेली हलगर्जी सहन केली जाणार नाही. तातडीने यावर कारवाई करून येत्या दोन महिन्यांत पुन्हा शिवरायांचा पुतळा बसविण्यात येईल.
- रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री

आमदार वैभव नाईकांनी केली पीडब्ल्यूडी कार्यालयाची तोडफोड

ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची माहिती मिळताच ते संतप्त झाले व त्यांनी हातात रॉड घेऊन थेट सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय गाठले व कार्यालयाची तोडफोड केली. कार्यालयात घुसून त्यांनी प्रत्येक दालनात असलेल्या टेबलवरील काचा फोडल्या. खिडक्या व खुर्च्यादेखील फोडल्या. यावेळी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी घाबरून बाहेर पळ काढला.

logo
marathi.freepressjournal.in