मुंबई : राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी वैयक्तिक कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पुढील व्यवस्था होईपर्यंत काम पाहण्याची विनंती राज्य सरकारने त्यांना केली आहे. ती त्यांनी मान्य केली असून जानेवारीपर्यंत काम पाहण्यास होकार दिला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्य मंत्रिमंडळांच्या बैठकीत दिली.
डिसेंबर २०२२ मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना बिरेंद्र सराफ यांची महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिल्यानंतर ते राज्याचे महाधिवक्ता बनले, विविध प्रकरणांमध्ये त्यांनी राज्य सरकारची बाजू दमदारपणे मांडली. मात्र दोन-अडीच वर्षांनंतर सराफ यांनी महाधिवक्तापदाचा राजीनामा दिल्याने चर्चेला उधाण आले आहे.
उच्च आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये बाजू मांडण्याची, तसेच महाराष्ट्र सरकारला कायदेशीर सल्ला देण्याची मुख्य जबाबदारी बिरेंद्र सराफ यांच्यावर होती. मुंबईतील आझाद मैदनात काही दिवसांपूर्वीच मनोज जरांगे केलेल्या बेमुदत उपोषणानंतर मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्याच्या निर्णयात बिरेंद्र सराफ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र आता त्यांनी अचानक राजीनामा दिला आहे.