महामानवाच्या कार्याचा प्रसार! राज्यात 'टूर सर्किट' योजना; मुंबई, नाशिक, नागपूरमध्ये आयोजन, पर्यटन विभागातर्फे विनाशुल्क सहल

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील महान कार्य, जीवाचे महत्त्व समाजातील सर्वच स्तरातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारच्या पर्यटन विभाग व पर्यटन संचालनालयामार्फत दोन दिवसीय टूर सर्किटचे आयोजन करण्यात आले आहे.
महामानवाच्या कार्याचा प्रसार! राज्यात 'टूर सर्किट' योजना; मुंबई, नाशिक, नागपूरमध्ये आयोजन, पर्यटन विभागातर्फे विनाशुल्क सहल
Published on

मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील महान कार्य, जीवाचे महत्त्व समाजातील सर्वच स्तरातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारच्या पर्यटन विभाग व पर्यटन संचालनालयामार्फत दोन दिवसीय टूर सर्किटचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त १४ व १५ एप्रिल रोजी या सहलीचे विनाशुल्क आयोजन केल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. मुंबई, नाशिक नागपूर येथील चैत्यभूमी, दीक्षाभूमी, मुक्त भूमी आदी ठिकाणचा समावेश करण्यात आला आहे.

मुंबईतील दादरमधील चैत्यभूमी, राजगृह, प्रिटींग प्रेस, परळ येथील बी.आय.टी चाळ, वडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालय या स्थळांचा समावेश आहे. तर नाशिकमधील येवले मुक्ती भूमी, त्रिरश्मी लेणी आणि काळाराम मंदिर या स्थळांचा समावेश आहे. तर नागपूर येथील दीक्षाभूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय, कामठी येथील ड्रॅगन पॅलेस आणि नागलोक विहार या स्थळांचा समावेश आहे. सदर टूर सर्कीटच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी जीवनाचा आणि त्यांच्या सामाजिक समता, शिक्षण आणि संविधान निर्मितीतील योगदानाचे महत्त्व सर्व सामान्य नागरिक व पर्यटकांपर्यंत पोहोचविण्याचा हा शासनाचा प्रयत्न आहे. सर्व नागरिक, पर्यटकांना या सहलीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

टूर सर्किटद्वारे पर्यटकांना त्यांचा समृद्ध वारसा समजण्याची संधी मिळेल. महाराष्ट्रातील चैत्यभूमी, दीक्षाभूमी, मुक्ती भूमी यांसारख्या ठिकाणांचा समावेश या उपक्रमात आहे, ज्यामुळे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पर्यटनाला चालना मिळेल.

समतेचा संदेश पोहोचवणार - प्रधान सचिव

प्रधान सचिव अतुल पाटणे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पर्यटन संचालनालयाने आयोजित टूर सर्किट हा एक अभिनव उपक्रम आहे. बाबासाहेबांचे विचार, त्यांचे सामाजिक योगदान आणि भारतीय संविधान निर्मितीतील त्यांचे कर्तृत्व यांचा गौरव करणे हा या सर्किटचा उद्देश आहे. या सर्किटद्वारे पर्यटकांना बाबासाहेबांच्या जीवनाशी निगडीत महत्त्वाच्या स्थळांचा अनुभव घेता येईल, ज्यामुळे त्यांचा इतिहास आणि तत्त्वज्ञान समजण्यास मदत होईल. चैत्यभूमी, दीक्षाभूमी यांसारखी स्थळे केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाची प्रेरणास्थाने आहेत. हा उपक्रम पर्यटनाला प्रोत्साहन देतानाच स्थानिक समुदायांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करेल. डॉ. बाबासाहेबांचा समतेचा संदेश सर्वदूर पोहोचवण्यासाठी हा प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरेल. पर्यटन संचालनालयाने यासाठी सखोल नियोजन केले असून, पर्यटकांना सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

logo
marathi.freepressjournal.in