

नवी दिल्ली : यंदा पावसाने ओढ दिल्याने यंदाच्या खरीप हंगामात कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेशातील काही भाग, तेलंगणा आणि राजस्थानमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी दिली.
चौहान म्हणाले, ‘आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेशातील रायलसीमा आणि लगतचे भाग, तेलंगणातील काही भाग तसेच राजस्थानातील काही भागांमध्ये दुष्काळाची चिंता आहे.
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले की, ते स्वतः दुष्काळग्रस्त राज्यांचा दौरा करणार असून, संबंधित राज्य सरकारांच्या सतत संपर्कात राहणार आहेत. ‘शेतजमीन पडीक राहू नये, हे आमचे तातडीचे उद्दिष्ट आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
रब्बी हंगामासाठी मदत करणार
आगामी रब्बी हंगामासाठी केंद्र सरकार राज्यांना कमी पाण्यात येणारी, कमी कालावधीत तयार होणारी तसेच स्थानिक माती आणि हवामानाला अनुकूल असलेली बियाणे व पिकांच्या वाणांची निवड करण्यास मदत करणार आहे. शेती सुरू ठेवण्यासाठी केंद्राकडून सहकार्य केले जाईल. तसेच राज्ये आणि इतर संबंधित घटकांमध्ये समन्वय व सहकार्य वाढविण्यासाठी केंद्र पुढाकार घेईल, असेही चौहान यांनी सांगितले.