थकीत वीजबिले माफ; शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा, दिवसा मिळणार १२ तास मोफत वीज

शेतकऱ्यांचे ७.५ अश्वशक्तीपर्यंतचे ४८ हजार कोटींचे थकीत वीजबिल माफ केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली. त्याशिवाय वर्षाच्या अखेरपर्यंत शेतकऱ्यांना दिवसा १२ तास मोफत वीज देण्याचा निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
थकीत वीजबिले माफ; शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा, दिवसा मिळणार १२ तास मोफत वीज
थकीत वीजबिले माफ; शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा, दिवसा मिळणार १२ तास मोफत वीजX | @Devendra_Office
Published on

मुंबई: शेतकऱ्यांचे ७.५ अश्वशक्तीपर्यंतचे ४८ हजार कोटींचे थकीत वीजबिल माफ केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली. त्याशिवाय वर्षाच्या अखेरपर्यंत शेतकऱ्यांना दिवसा १२ तास मोफत वीज देण्याचा निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पाठोपाठ शेतकऱ्यांची पाटी कोरी व्हावी आणि या पाटीवर त्याला नवा इतिहास लिहिता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या किसान मोर्चाच्या वतीने बुधवारी फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमधील या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.

जलयुक्त शिवारमुळे शेतकरी तीन- तीन पिके घेऊ लागला आहे. पुढच्या काळात शेतकऱ्यांचे गट तयार केले तर शेतकऱ्यांना पूरक पिके घेता येतील आणि शेती हा उद्योग फायद्यात आणता येईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

राज्यात ५२ टक्के भाग अवर्षणप्रवण असताना दुसरीकडे अनेक भागांत पावसाचे पाणी समुद्रात जाऊन वाया जाते. गोदावरी, तापी खोऱ्यांत हे पाणी यावे यासाठी वैनगंगा, नळगंगा सारख्या योजनांतून वाहून जाणारे पाणी उचलले जाईल. त्यासाठी सुमारे २४ नवी धरणे आणि १६ जुन्या धरणांची उंची वाढविली जाईल. विदर्भात एकही जिल्हा दुष्काळी राहणार नाही. याचवर्षी हे काम पूर्ण करण्यासाठी वेगवान प्रयत्न सुरू आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कर्जमाफी हा उपाय नाही

शेतीक्षेत्र सक्षम आणि शाश्वत व्हावे यासाठी केंद्र तसेच राज्य सरकार हातात हात घालून प्रयत्न करत आहे. कर्जमाफी हा काही अंतिम उपाय नाही. शेतकऱ्यांना सातत्याने कर्जमाफी द्यावी लागत असेल, तर शेतीची अवस्था कठीण आहे, असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे. त्यामुळे शेती फायद्याची व्हावी यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्याखेरीज पर्याय नाही, असेही फडणवीस म्हणाले.

पाठ थोपटून घेण्याचा प्रकार : राजू शेट्टी

इंदापूर : कर्जमाफीची ‘अंमलबजावणी करण्याआधीच सत्कार करणे म्हणजे हा लाळघोटेपणा आहे. स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेणे असे याला म्हणतात’, अशी कडवट टीका शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी बुधवारी केली. राज्यातील कर्जमाफीबाबत शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना, ‘कर्जमाफीचा निर्णय हा मूठभर शेतकऱ्यांना फायद्याचा तर बहुसंख्य शेतकऱ्यांना नाराज करणारा आहे. मुख्यमंत्र्यांनीच २०२४ ला निवडणुकीच्या वेळेस आम्ही सरसकट कर्जमाफी करू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते’, याची आठवण शेट्टींनी करून दिली.

तसेच ३० जुलैच्या आधी देखील शेतकरी कर्जमाफी होणार नाही, आणखी नवीन तारीख मिळेल, असे भाकित त्यांनी केले. तसे झाले तर आम्ही रस्त्यावरची लढाई सुरू करू असा इशारा त्यांनी दिला.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in