'एनआयए'च्या महासंचालकपदी सदानंद दाते

सदानंद दाते हे १९९०च्या तुकडीचे, महाराष्ट्र श्रेणीचे भारतीय पोलीस दलातील (आयपीएस) अधिकारी आहेत. सत्तावन्न वर्षीय दाते यांनी केंद्रीय अन्वेषण ब्युरोमध्ये डीआयजी, केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) आयजी (ऑप्स) आणि मीरा-भाईंदर आणि वसई-विरार शहरासाठी पोलीस आयुक्त म्हणूनही काम केले आहे.
'एनआयए'च्या महासंचालकपदी सदानंद दाते

नवी दिल्ली : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख सदानंद वसंत दाते यांची राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) महासंचालकपदी निवड झाली आहे. सध्या एनआयए महासंचालकपदी असेलेले दिनकर गुप्ता ३१ मार्च रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर दाते नवीन पदभार स्वीकारतील. दाते ३१ डिसेंबर २०२६ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. तोपर्यंत ते या पदावर कार्यरत राहतील. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नेमणूक समितीने २६ मार्च रोजी दाते यांच्या नेमणुकीसंबंधी आदेश जारी केला.

सदानंद दाते हे १९९०च्या तुकडीचे, महाराष्ट्र श्रेणीचे भारतीय पोलीस दलातील (आयपीएस) अधिकारी आहेत. सत्तावन्न वर्षीय दाते यांनी केंद्रीय अन्वेषण ब्युरोमध्ये डीआयजी, केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) आयजी (ऑप्स) आणि मीरा-भाईंदर आणि वसई-विरार शहरासाठी पोलीस आयुक्त म्हणूनही काम केले आहे. त्यांनी पुणे विद्यापीठातून एमकॉम, तसेच आर्थिक गुन्ह्यांमध्ये डॉक्टरेट केले आहे.

मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यावेळी दाते यांनी बजावलेल्या विशेष भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक देऊन सन्मानित करण्यात आले. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई पोलीस दलात अतिरिक्त पोलीस आयुक्त असलेल्या दाते यांनी दहशतवादी अजमल कसाब आणि अबू इस्माईलशी लढा दिला. दाते यांच्या पथकाने या दहशतवाद्यांचा पाठलाग केला. अतिरेक्यांनी जवळ येत असलेल्या पोलीस पथकावर हँडग्रेनेड फेकले. दाते यांच्या हातात आणि पायात स्प्लिंटर घुसले. दुखापतीमुळे खचून न जाता दाते यांनी दोन दहशतवाद्यांवर गोळीबार सुरूच ठेवला आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या स्थानाबद्दल माहिती दिली. तासभर त्यांना रोखून ठेवल्यानंतर दाते रक्त वाहून गेल्याने बेशुद्ध पडले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in